द स्टोनिंग ऑफ सोराया एम : स्त्रीशोषण, पुरुषसत्ता आणि माणुसकीचा खून



    .... आणि पहिला दगड तिच्या पित्याने मारला 

चार-पाच दिवसांपूर्वी एक चित्रपट पाहण्यात आला. तो ‘द स्टोनिंग ऑफ सोराया एम’ हा चित्रपट होता. यात एका स्त्रीला तिचा नवरा तिच्या चारित्र्यावर संशय घेतो, त्यामुळे सगळा समाज एकत्र येऊन सगळ्यांनी दगड मारून मारून तिला मृत्युदंड दिला जातो. त्यात पहिला दगड तिचा पिता मारतो. अशी ती एक सत्य कहाणी आहे.

‘द स्टोनिंग ऑफ सोराया एम’ हा चित्रपट केवळ एका स्त्रीला दगड मारून ठार केल्याची कथा नाही, तर निरापराध जीवावर होत असलेल्या अन्यायाला मान्यता देणाऱ्या पुरुषसत्ताक मानसिकतेचा पर्दाफाश करतो.

सोरायाची कहाणी आपल्याला सांगते की स्त्रीशोषणाची सुरुवात पुरुषाच्या क्षुल्लक स्वार्थापासून होते. आणि त्याचं जालीम शस्त्र म्हणजे स्त्रीचं चारित्र्य संशयाच्या भोवऱ्यात उभे करणे. अशा वेळी पुरुषाच्या शब्दाला पुराव्याशिवाय सत्य मानले जाते आणि स्त्रीच्या अस्तित्वालाच गुन्हा ठरवले जाते, तेव्हा अन्यायाला नैतिकतेचा मुखवटा मिळतो.

गुन्हा नवऱ्याचा, शिक्षा बायकोला

१९८६ मधील इराणच्या एका गावात घडलेल्या घटनेवर आधारित हा चित्रपट सोराया नावाच्या स्त्रीची शोकांतिका मांडतो. फ्रेंच-इराणी पत्रकार फ्रेदून साहेबजाम यांच्या पुस्तकातून ही कहाणी जगासमोर आली.

चित्रपटात दाखवल्याप्रमाणे सोरायाचा नवरा अली याला चौदा वर्षांच्या मुलीशी लग्न करायचे असते. त्यासाठी त्याला विद्यमान वैवाहिक नात्यातून मुक्त व्हायचे असते. त्याची पत्नी वेगळं व्हायला तयार नसते. मग तो एक कट रचतो. पत्नीची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी तो तिच्यावर व्यभिचाराचा खोटा आरोप लावण्याचा मार्ग निवडतो.

पत्नीला एका विधुर व्यक्तीच्या घरी कामाला पाठवतो. काही दिवसांनी तो तिच्यावर व्यभिचाराचा आरोप करतो. मौलवीला तो आधी गुन्हेगार होता हे सगळ्यांना सांगण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून आपल्याशी सहमत करून घेतो. गावभर खोटी अफवा पसरवून समाजाला आपल्या बाजूने करून घेतो.

इथेच या कथेतला पहिला गंभीर प्रश्न उभा राहतो. स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या स्त्रीच्या आयुष्याशी खेळणाऱ्या पुरुषाच्या हेतूची चौकशी का होत नाही? उलट त्याच्या आरोपांना महत्त्व दिले जाते. स्त्रीने स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, तरी तिचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी कुणी दाखवत नाही.

सोरायाच्या बाबतीतही हेच घडते. तिच्यावर व्यभिचाराचा आरोप ठेवला जातो. गावातील पुरुषप्रधान व्यवस्था तिच्या बाजूने पुरावे तपासण्याऐवजी तिच्या चारित्र्याचा निकाल लावते. न्यायाची प्रक्रिया सत्य शोधण्याचे साधन न राहता आधीच ठरवलेल्या शिक्षेला मान्यता देण्याचे माध्यम बनते.

अखेरीस सोरायाला कमरेपर्यंत जमिनीत पुरले जाते आणि दगड मारून ठार केले जाते. त्या गर्दीत तिचे वडील, नवरा आणि तिची मुलेही असतात. ज्या मुलांना आईच्या कुशीत सुरक्षितता मिळायला हवी, त्यांच्याच डोळ्यांसमोर तिची हत्या केली जाते. चित्रपटातील हा प्रसंग केवळ एका स्त्रीच्या मृत्यूचे चित्रण करत नाही, तर हिंसेला सामाजिक मान्यता मिळाल्यावर माणसातील माणुसकी कशी हरवते हे दर्शवते.

पुरुषी स्वार्थाला नैतिकतेचा आधार कसा मिळतो?

सोरायाच्या मृत्यूमागे केवळ एका पुरुषाची क्रूरता नाही. त्याच्या स्वार्थाला साथ देणारी, त्याच्या आरोपांवर विश्वास ठेवणारी आणि स्त्रीला दुय्यम स्थान देणारी सामाजिक व्यवस्था आहे.

स्त्रीने कोणाशी बोलावे, कसे राहावे, काय करावे, कोणाशी लग्न करावे आणि कोणत्या परिस्थितीत संसार टिकवावा, याचे निर्णय अनेकदा तिच्याऐवजी इतरांनी घ्यावेत, अशी अपेक्षा केली जाते. पुरुषाच्या चुकीकडे दुर्लक्ष केले जाते; पण स्त्रीच्या वर्तनातील अगदी छोट्या गोष्टीवरून तिच्या चारित्र्याचा निकाल लावला जातो.

पुरुषाने संशय घेतला की स्त्रीने स्वतःला निर्दोष सिद्ध करायचे. पुरुषाने नात्यात अन्याय करायचा, स्त्रीने संसार टिकवण्यासाठी सहन करायचे. पुरुषाने नाते तोडण्याचा निर्णय घ्यायचा व त्याच्या निर्णयाचे परिणाम स्त्रीने भोगायचे. या सगळ्यात कुठेही स्त्रीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाला जागाच उरत नाही.

सोरायाच्या कथेत नवऱ्याची इच्छा महत्त्वाची ठरते, तिच्या जगण्याचा अधिकार मात्र गौण मानला जातो. त्याला दुसरे लग्न करायचे आहे, म्हणून तिच्या आयुष्याचा अंत करण्याइतका तो निर्दयी होतो. त्याच्या इच्छेला विरोध करणे हाच जणू तिचा अपराध ठरतो.

स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती न मानता पुरुषाच्या इच्छेनुसार जगणारी व्यक्ती समजले जाते, तेव्हा नात्यातील प्रेमाची जागा मालकीची भावना घेते. अशा मानसिकतेचा परिणाम केवळ टोकाच्या हिंसेत दिसतो असे नाही. संशय, अपमान, आर्थिक नियंत्रण, मानसिक छळ आणि स्त्रीच्या निर्णयस्वातंत्र्यावर बंधने घालणे, या गोष्टीही त्याच विषम विचारसरणीची वेगवेगळी रूपे आहेत. हे शरीरावर जखमा न देता तिला आतून संपवणारे दगड आहेत.

धर्म, परंपरा आणि अन्यायाचे समर्थन

या चित्रपटातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धर्म आणि नैतिकतेच्या नावाखाली अन्यायाला मिळणारी मान्यता.

धर्माच्या नावाने केले जाणारे प्रत्येक कृत्य योग्य असतेच असे नाही. कोणत्याही धार्मिक परंपरेचा अर्थ लावताना विवेक, मानवी प्रतिष्ठा आणि न्याय यांचा विचार होणे आवश्यक आहे.

धार्मिक अधिकार काही व्यक्तींच्या हातात केंद्रित झाले आणि त्यांच्या निर्णयांना प्रश्न विचारण्यास मनाई झाली, तर त्याचा वापर दुर्बल व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो हे वास्तव आहे. (आपल्या देशात दलित व स्त्रिया हे अशाच व्यवस्थेचे शोषित आहेत.)

सोरायाच्या बाबतीत आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याऐवजी पुरुषप्रधान व्यवस्थेचा निर्णय महत्त्वाचा ठरतो. तिच्या बाजूने उभे राहण्याऐवजी समाजातील प्रभावशाली व्यक्ती अन्यायाच्या प्रक्रियेत सहभागी होतात. परिणामी, हिंसा ही हिंसा म्हणून न पाहता शिक्षेचा एक प्रकार म्हणून स्वीकारली जाते.

इथे प्रश्न एखाद्या धर्माचा किंवा त्या धर्मातील सर्व अनुयायांचा नाही. प्रश्न असा आहे की कोणत्याही धर्माचा, परंपरेचा किंवा सामाजिक प्रतिष्ठेचा आधार घेऊन माणसाच्या जगण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा कुणाला कसा काय अधिकार असू शकतो?

हिंसा जेव्हा न्याय म्हणून सादर केली जाते, तेव्हा केवळ त्या व्यक्तीवर अन्याय होत नाही; न्यायाच्या संकल्पनेलाच काळिमा फासला जातो.

सोरायाच्या कथेत भारताचा आरसा

इराणमधील ही घटना भारतीय समाजापेक्षा वेगळ्या सामाजिक आणि कायदेशीर परिस्थितीत घडलेली असली, तरी तिच्या मुळाशी असलेली स्त्रीविरोधी मानसिकता आपल्यासाठी अनोळखी नाही. इथली सती प्रथा समाजमान्य हिंसेचे उदाहरण आपल्याला माहीत आहे.

भारतात आजही काही ठिकाणी स्त्रियांना चेटकीण किंवा डाकीण ठरवून छळले जाते. काही प्रकरणांत अशा आरोपांमागे अंधश्रद्धा असते, तर काही ठिकाणी जमीन, मालमत्ता, वैयक्तिक वैर किंवा सामाजिक वर्चस्व यांचा संबंध आढळतो. स्त्रीला अमानवी ठरवले की तिच्याविरुद्धचा अन्याय योग्य असल्याचा आभास निर्माण करणे सोपे होते.

काही भागांत जात, कुटुंबाची प्रतिष्ठा किंवा समाजमान्यतेच्या नावाखाली प्रेमविवाह करणाऱ्या तरुण-तरुणींना धमक्या दिल्या जातात. काही प्रकरणांत तथाकथित प्रतिष्ठेच्या नावाखाली हत्या केली जाते. काही ठिकाणी तिच्याशी नाते तोडले जाते. खाप पंचायतींसारख्या अनौपचारिक संस्थांच्या निर्णयांत व्यक्तिस्वातंत्र्य व घटनात्मक अधिकार यांना पायदळी तुडवले जाते.

या सर्व घटनांचे स्वरूप एकसारखे नाही. तरीही त्यांच्यात एक समान धागा दिसतो - स्त्रीने स्वतःचा निर्णय घेतला की कुटुंबाच्या किंवा समाजाच्या अधिकाराला आव्हान दिले, असे मानले जाते. मग त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य दडपण्यासाठी सामाजिक बहिष्कारापासून ते हिंसेपर्यंत वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला जातो.

सोरायावर व्यभिचाराचा आरोप ठेवला गेला. आपल्या समाजातही स्त्रीच्या चारित्र्यावर संशय घेणे, अफवा पसरवणे, तिच्या निर्णयाला कुटुंबाच्या प्रतिष्ठेशी जोडणे, हे तिच्यावर नियंत्रण ठेवण्याची दुष्ट प्रवृत्ती आहेच.

म्हणून या चित्रपटाकडे केवळ दुसऱ्या देशातील अमानुष घटना म्हणून पाहणे पुरेसे नाही. त्यातून आपल्या समाजातील विषमता, स्त्रीच्या स्वातंत्र्याबद्दलचा दृष्टिकोन आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची आपली तयारी तपासली पाहिजे.

हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसा : स्त्रीच्या आयुष्याची किंमत किती?

चाळीस वर्षांपूर्वी हुंड्यासाठी होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना कानावर यायच्या, इतर बायका हळहळायच्या. एका घटनेत ‘भाड्यानं मायांगात ढोराला बांधायची मेख ठोकून जीव घेतला तिचा’ असं आया-बाया बोलत होत्या. त्यावेळी मला फार काही कळत नव्हतं, मात्र ते शब्द आजही लक्षात आहेत.

विवाहित स्त्रियांची हत्या आजही होते, संशयावरून होणारी मारहाण आणि कौटुंबिक हिंसा या घटनांची कारणे वेगवेगळी असली, तरी त्यांच्याकडे पाहताना एक मूलभूत प्रश्न असा आहे की, विवाहामुळे एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीवर मालकी मिळते का?

लग्नानंतर स्त्रीने स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवाव्यात, नवऱ्याचा अपमान सहन करावा, घर टिकवण्यासाठी अन्याय गिळावा आणि मुलांच्या भविष्यासाठी स्वतःचे दुःख लपवावे, अशी अपेक्षा अनेकदा तिच्याकडून केली जाते. या अपेक्षांना प्रेम, त्याग, संस्कार आणि कुटुंबाची प्रतिष्ठा अशा शब्दांचे आवरण दिले जाते.

परंतु त्यागाची अपेक्षा कायम एकाच व्यक्तीकडून केली जात असेल, तर त्या नात्यात समानता नाही. प्रेमाच्या नावाखाली दबाव, नियंत्रण होत असेल, तर त्या नात्याची चिकित्सा केली गेली पाहिजे. कुटुंब टिकवण्यासाठी एका व्यक्तीचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उद्ध्वस्त होत असेल, तर कुटुंब टिकणे याचे महत्त्व माणसाच्या जगण्यापेक्षा मोठे ठरते. ते स्त्रीचा बळी मागत असते.

सोरायाचा नवरा दुसरे लग्न करण्याच्या इच्छेने तिच्याविरुद्ध कट रचतो. त्याचा स्वार्थ व तिचा कुटुंब नातं टिकविण्याचा हट्ट यापायी तिला तिचा जीव गमवावा लागतो. तिच्या मुलांच्या मनावर झालेल्या आघातांची भरपाई होत नाही आणि समाजाची नैतिक जबाबदारीही संपत नाही.

मुलांच्या हातात दगड कोण देतो?

सोरायाच्या मुलांचा संदर्भ हा चित्रपटातील सर्वांत वेदनादायी भागांपैकी एक आहे. आईच्या हत्येच्या प्रसंगात मुलांना सहभागी करून घेणे म्हणजे एका कुटुंबाचा विनाश करण्याबरोबरच पुढच्या पिढीच्या मनावर हिंसेची छाप उमटवणे होय.

मुलांना स्त्रीचा आदर करायला शिकवणे म्हणजे केवळ तिच्याशी सभ्यपणे बोलायला शिकवणे नव्हे. तिचे मत ऐकणे, तिच्या नकाराचा आदर करणे, तिच्या निर्णयस्वातंत्र्याला मान्यता देणे आणि मतभेद असले तरी हिंसेचा मार्ग न स्वीकारणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

मुलगा रागावला तर त्याच्या रागाला स्वाभाविक मानायचे आणि मुलगी रागावली तर तिला गप्प बसायला सांगायचे, अशी विषमता घरात रुजली तर तिचे परिणाम पुढे समाजात दिसतात. मुलीला कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी दिली जाते; पण मुलाला स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण ठेवण्याची शिकवण दिली जात नाही.

अशा संस्कारांतून प्रत्यक्ष दगड उचलला जात नसेल, तरी अपमानाचे, संशयाचे आणि हिंसेचे अदृश्य दगड तयार होतात. स्त्रीने प्रश्न विचारू नयेत, अन्यायाविरुद्ध आवाज उठवू नये आणि स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेऊ नये, ही शिकवण तिच्या व्यक्तिमत्त्वाला खुरटी करते.

म्हणून स्त्रीसमानतेची सुरुवात घरातून झाली पाहिजे. मुलांना केवळ चांगला मुलगा होण्याचे नव्हे, तर समतेवर विश्वास ठेवणारा माणूस होण्याचे शिक्षण मिळाले पाहिजे. स्त्रीचा सन्मान हा पुरुषाचा अपमान नसतो. व स्त्रीला समान अधिकार मिळणे म्हणजे पुरुषाचे अधिकार हिरावून घेणे नव्हे. तिला ते निसर्गाने बहाल केलेलेच आहेत, माणसाने आपल्या स्वार्थापायी ते हिरावून घेतले आहेत इतकंच.

स्त्रीचे स्वातंत्र्य आणि समाजाची जबाबदारी

आज स्त्रिया शिक्षण घेत आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत आणि विविध क्षेत्रांत महत्त्वाची कामगिरी करत आहेत. कायद्याने त्यांना अनेक अधिकार दिले आहेत. तरीही सामाजिक मानसिकता बदलण्याचा वेग सर्वत्र सारखा नाही.

स्त्रीने नोकरी करावी, पण घराची संपूर्ण जबाबदारीही तिनेच घ्यावी; तिने कमवावे, पण आर्थिक निर्णयांवर तिचा अधिकार नसावा; तिने अन्यायाविरुद्ध बोलावे, पण कुटुंबाची बदनामी होईल असे काही करू नये—अशा परस्परविरोधी अपेक्षा अनेक स्त्रियांच्या बाबतीत दिसून येतात.

याचा अर्थ प्रत्येक पुरुष स्त्रीविरोधी आहे किंवा प्रत्येक कुटुंब स्त्रीवर अन्याय करते, असा नाही. अनेक पुरुष समानतेचे समर्थक आहेत आणि अनेक कुटुंबे मुलींना समान संधी देतात. परंतु काही ठिकाणी टिकून असलेल्या विषमतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

सोरायाची कथा पुरुषांविरुद्ध स्त्रियांनी संघर्ष करावा, असा संदेश देत नाही. ती अन्याय करणाऱ्या मानसिकतेविरुद्ध उभे राहण्याची मागणी करते. स्त्रीला समान अधिकार मिळणे म्हणजे पुरुषाला कमी लेखणे नव्हे; तर दोघांनाही सन्मानाने जगता येईल अशी व्यवस्था निर्माण करणे होय.

स्त्रीवरील हिंसा रोखण्यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, पीडितेला सुरक्षित वातावरण, निष्पक्ष चौकशी आणि सामाजिक संस्थांची जबाबदारी आवश्यक आहे.

शेवटी, सोरायाची कहाणी एका स्त्रीच्या मृत्यूवर संपत नाही. ती आपल्यासमोर अनेक प्रश्न उभे करते. स्त्रीच्या चारित्र्याचा निर्णय घेण्याचा अधिकार समाजाला कोणी दिला? पुरुषाच्या स्वार्थासाठी स्त्रीने स्वतःचे आयुष्य का गमवावे? परंपरा आणि प्रतिष्ठा यांच्यापेक्षा माणसाचा जीव मोठा नाही का? आणि अन्याय आपल्या डोळ्यांसमोर घडत असताना गप्प राहणारा समाज स्वतःला सुसंस्कृत कसा म्हणवू शकतो?

या प्रश्नांची उत्तरे शोधताना केवळ इतर देशांकडे किंवा समाजांकडे बोट दाखवून चालणार नाही. आपल्या घरात, मुलांच्या संगोपनात, स्त्रियांविषयीच्या भाषेत आणि त्यांच्या निर्णयांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातही बदल घडवावा लागेल.

सोरायाला मारलेल्या दगडांनी तिच्या शरीरावर आघात केला नाही; त्या दगडांनी माणुसकीची हत्या केली. तिच्या हत्येत सहभागी झालेले हात मोजता येतील; पण अशा अन्यायाला योग्य ठरवणारी मानसिकता किती मनांत रुजलेली आहे, याचा हिशेब लावणे कठीण आहे.

स्त्रीच्या जगण्याचा अधिकार हा कोणत्याही पुरुषाच्या इच्छेवर, समाजाच्या प्रतिष्ठेवर किंवा परंपरेच्या मनमानी अर्थावर अवलंबून असू शकत नाही. तिचे आयुष्य तिचे आहे. तिच्या स्वातंत्र्याचा, सन्मानाचा आणि सुरक्षिततेचा आदर करणे ही समाजाची नैतिक जबाबदारी आहे.

स्त्रीच्या आयुष्यापेक्षा पुरुषाचा अहंकार मोठा ठरत असेल, तर आपण नेमक्या कोणत्या संस्कृतीचा अभिमान बाळगतो आहोत?

हा प्रश्न केवळ सोरायाचा नाही. तो प्रत्येक त्या स्त्रीचा आहे, जिच्या जगण्यापेक्षा तिच्या चारित्र्याला महत्त्व दिले जाते; प्रत्येक त्या मुलीचा आहे, जिला स्वतःचे निर्णय घेण्याची शिक्षा भोगावी लागते; आणि प्रत्येक त्या समाजाचा आहे, जो अन्याय पाहूनही स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेतो.

स्त्रीला मारण्यासाठी उचललेला दगड खाली ठेवणे म्हणजे केवळ हिंसा थांबवणे नव्हे; स्त्रीचे माणूसपण स्वीकारण्यास नकार देणारी मानसिकता बदलणे होय. माणुसकीची खरी सुरुवात तिथूनच होते.

- छाया

टिप्पण्या

  1. खर पहाता " दगड " हे शिर्षक चातिशय मार्मिक आहे .. जवळपास अनिष्ठ रुढी परंपरा ह्या समाजाला लागलेली किड आहे .. एकाच्या स्वार्थासाठी दुसर्‍याचा बळी ते पण एका निष्पाप जीवाचा बळी देणं
    तिने सहमती दिली नाही म्हणुन तिच्यावरती चारित्र्य हनन हा प्रभावी ऊपाय शोधणे म्हणजेच ही माणुसकीला लागलेली भयानक किड आहे ...
    पुरुषप्रधान संस्काृतित हे अतिशय भयानक सत्य अद्यापही डोके वर काढु पहात असताना निदर्शनास येत आहे ..याला कुठेतरी मुठमाती दिली पाहीजे
    एकंदरीत हा लेख अतिशय प्रखर वास्तववादी आणि सुशिक्षितांच्या डोळ्यात अंजन घालणारा असाच आहे ...
    खुपच सुंदर लेखन कौशल्य आणि विविध मुद्यावर अगदी सखोल विस्तृत वर्णन केलेले अहे ..
    ताई खुपच सुंदर लेख आहे हा .. एक समाज प्रबोधनपर वास्तववादी लेखणीला माझा त्रिवार सलाम
    जय भीम जय संविधान

    बाजीराव काळे कोल्हापुरकर

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. संवेदनशील माणसंच मानवतेची आशा आहेत, लेख आवडला याचा मनस्वी आनंद आहे. मनापासून आभार 🙏🙏

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .