बोल्ट्या : एका मुक्या जीवाचा आनंददायी सहवास बोल्ट्या - मायाळू, खूर.. खूर.. जीव बोल्ट्या फक्त आगाऊ, खडूस, हावरट, खुरखुर करणारा आणि ओरखडे काढणारा असाच नव्हता. त्याच्या स्वभावाच्या या सगळ्या खोडकर छटांपलीकडे तो एक अतिशय प्रेमळ, खेळकर, दयाळू आणि संवेदनशील जीव होता. त्याच्यात एक निरागस बालपण होतं, मायेचा ओलावा सामावलेला होता. त्याला बोलता येत नव्हतं, मात्र त्याच्या वागण्यातून तो जे काही सांगायचा, ते समजून घेण्यासाठी शब्दांची गरजच नव्हती. बोल्ट्याच्या दिवसाची सुरुवातच मुळी त्याच्या मित्राला उठवण्यापासून व्हायची. सकाळ झाली की त्याला त्याच्या बास्केटमधून बाहेर काढताच तो टुन्नकन उडी मारुन पळत सुटायचा आणि प्रतीक झोपलेल्या बेडवर उड्या मारायचा प्रयत्न करायचा. तीन-चार प्रयत्नात तो वर जाण्यात यशस्वी व्हायचा. स्वतःच्या खाण्यापिण्यापेक्षाही आधी आपल्या मित्राची आठवण यायची. तो सरळ त्याच्याजवळ जायचा. आधी त्याच्या भोवती गोल-गोल फिरायचा. जणू काही, 'उठी उठी गोपाळा' किंवा 'जागो पप्पू प्यारे' नाही तर मग 'सुबह हो गयी मामू' असं काही तरी तो नक्कीच म्हणत असावा. श...