दत्तू मास्तर : काटेरी बेट झालेल्या जगात माणुसकी रुजवणारी कादंबरी |पुस्तक परिचय








दत्तू मास्तर : काटेरी बेट झालेल्या जगात माणुसकी रुजवणारी कादंबरी |पुस्तक परिचय 




                    हल्ली माणसाच्या आत्मकेंद्रीपणने कळस गाठला आहे. मी आणि माझं याशिवाय माणसाला काही दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक माणूस हा काटेरी बेट होत चालला आहे. या आत्मकेंद्री पणामुळे मानवी मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत.
 या कारणाने समाजात पराकोटीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. हे जरी आजच्या समाजाचं वास्तव असलं तरी काही माणसं स्वार्थ बाजूला ठेवून संताचे, महामानवांचे मानवकल्याणाचे विचार कुठलाही गाजावाजा न करता आपल्या कृतीतून जगत असतात व समाजात रूजवत असतात. आपल्या आजूबाजूचे जग सुंदर समृद्ध करण्यासाठी अहोरात्र झटत असतात. मानवते प्रति अपार करूणा असलेल्या मास्तरची कहाणी योगीराज वाघमारे यांच्या "दत्तू मास्तर" या कादंबरीचा विषय आहे. यशोदीप प्रकाशना कडून अलिकडेच प्रकाशित झालेली योगिराज वाघमारे यांची ही कादंबरी महत्त्वाची जीवनमूल्य घेऊन वाचकासमोर आली आहे.
 योगिराज वाघमारे साहित्यविश्वातील मानदंड आहेत अस मत पाठराखण करताना प्रकाशिका प्राध्यापिका रुपाली अवचारे यांनी नोंदवलं आहे.
      योगीराज वाघमारे यांनी मानवतावादी भूमिकेतून सातत्याने लेखन करीत समाजात प्रबोधन करणारे व परिवर्तनवादी विचार रुजविणारे विपुल लेखन केले आहे. यशोदीप पब्लिकेशन्स कडून आलेली कादंबरी "दत्तू मास्तर " या कादंबरीच्या मनोगतात लेखक म्हणतात- 
    " देशाला स्वातंत्र्य मिळालं. पंचायत राज सुरू झालं. तेव्हा ग्रामीण भागात शिक्षणाची पहाट झाली. वाड्या-वस्त्यांवर शाळा सुरू झालेल्या. समस्यांचा डोंगर उभा राहिला. गावात शाळेला इमारत नाही. देवळात' पारावर' पडक्या वाड्यात 'गोठ्यात वर्ग भरायचे. शाळा आहे तर मास्तर नसायचे. मास्तर असेल तर विद्यार्थी नसायचे. अशी शाळा भरवायची म्हणजे एक दिव्य असायचे.
 गाव वाडी वर जायला रस्ता नसायचा. मागासवर्गीय मास्तरची तर याहून अधिक फजिती व्हायची. महार मास्तर आमच्या शाळेला नको शाळा देवळात भरतात बाटावाट होईल म्हणून शाळा बंद केली जायची.
 मागासवर्गीयांची घरे नसल्याने महार मात्र खेड्यात टिकत नसे. अशा एक ना अनेक अडचणीवर मात करीत शाळा पुढे चालवणार्‍या मास्तरची कहाणी म्हणजे दत्तू मास्तर ही कादंबरी होय. 
मानवीजग आधी माणसाच्या विचारात निर्माण झाल, मग ते अस्तित्वात आलं .
आपला भवताल सुंदर करणे विद्रूप करणे हे सर्वस्वी माणसाच्या विचारांवर अवलंबून असते.
 दत्तू मास्तर सुंदर विचाराच्या व्यक्तिमत्त्वाची कहाणी आहे . दुर्गम भागातील एका खेड्यात
 दत्तू मास्तर या तरूण शिक्षकांची नेमणूक होते.
गावकरी कसे असतील? ते आपल्याला स्वीकारतील का ?नवीन गावात राहायला घर मिळेल का? असे अनेक प्रश्न घेऊन
 डोंगर दर्याचा घाट चढून पार करीत ,
दत्तू मास्तर पाडोळी या नोकरीच्या खेड्यात दाखल होतात .
गावात प्रवेश करताच विठ्ठलाचं मंदिर लागत. कुठे जायचं माहीत नसल्याने मास्तर मंदिराच्या ओट्यावर बसतात. मंदिरातून आजारी माणसाच्या कण्ण्याहचा आवाज मास्तराच्या कानी पडतो. संवेदनशील मनाच्या मास्तरांना राहवत नाही. त्या आवाजाच्या दिशेने जाऊन त्या आजारी माणसाची विचारपूस करतात. गुंडी नावाचा मुलगा गुरं चरत असताना पायात काटा पुसून जखमी होऊन पडलेला असतो. मास्तर त्याच्या जखमेतील पस काढून त्याला बरं करतात. गुंडी व दत्तू मास्तर यांचे कायमचे स्नेह स्नेहबंध जुळून येतात जेवणाचे निमंत्रण स्वीकारून कमी विद्यार्थिनीच्या घरी जेवायला गेले असता, तिची आई आजारी असलेली बघून मास्तर अस्वस्थ होतात.
गावात सगळीकडे घाणीचे साम्राज्य, रोगराई अंधश्रद्धा यांच्या विळख्यात अडकलेला गाव बघून मास्तरांच्या मनाची अस्वस्थता अजुन वाढते.
 गावातील पाटील, कारभारी तसेच सगळ्या गावकऱ्यांचे जनमत तयार करून मास्तर गावच्या सुधारणेला सुरुवात करतात. गावकऱ्यांच्या मदतीने ग्राम सभा भरून समस्यांचे मूळ कारण समजावण्यासाठी गावातील लोकांचे प्रबोधन करतात.
 या सगळ्या गोष्टी गावाच्या व गावातील लोकांच्या कल्याणासाठी आहेत हे लक्षात येताच सगळा गाव मास्तरांच्या पाठीशी उभा राहतो. हळूहळू गावातील सगळ्या समस्या सोडवून शाळेसह गावाचा हे सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मास्तर रात्रंदिवस झटत असतात.
" गावाला जसा देऊळ पाहिजे तसा शाळाही पाहिजे आणि आरोग्य मंदिरही" या वाक्यातून लेखकाने खूप मोठा संदेश दिलेला आहे.
 हा विचार ग्राम पातळीपासून ते देशपातळीपर्यंत लागू होणारा आहे. शिक्षण आणि आरोग्य सुविधा सामान्य माणसाच्या जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी आवश्यक आहेत ती प्रत्येकाला मिळायलाच हव्यात असा संदेश लेखक देतात.
" मंडळी आपल्या सारखे गावचे हेच करणारे लोक असतील तिथं काहीही होऊ शकतं "
हे दत्तू मास्तरांचं वाक्य समाजाला जागं करणार आहे.
 मानव कल्याणाची कोणतेही काम तळमळीने व प्रामाणिकपणे हाती घेतलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मग ती देशहिताच्या कामासाठी असो की समाजहिताच्या असो, हे मूलभूत तत्त्व लेखक वाचकाच्या मनावर बिंबवतात. दत्तू मास्तरांनी पाडोळीत शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर, सर्वात आधी शाळेची दुरवस्था दूर करून शाळा नियमित सुरू केली व खेड्यातील मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करून मुलांच्या भविष्य निर्माणाचे कार्य हाती घेतले. 
 गावातील घरासमोर चे उखंडे उचलून गावाबाहेर नेले व ग्राम स्वच्छता मोहीम राबवली.
गावकऱ्यांसाठी गावकऱ्यांच्या मदतीने पिण्याच्या पाण्यासाठी आड खोदला. गावात आरोग्य सुविधा नसल्याने मास्तर स्वतः वैद्यकीय ज्ञान संपादन करून गावकऱ्यांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. कमी या विद्यार्थिनीच्या होऊ घातलेल्या बालविवाह थांबवून तिच्या आई-वडिलांचं समुपदेशन करून तिच्या पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला.
 दत्तू मास्तर केवळ शाळेचे व विद्यार्थ्यांचे शिक्षक न राहता संपूर्ण समाजाचे शिक्षक होतात.
        शिक्षकांनी ठरवला तर समाजाच्या हितासाठी खूप काही करू शकतात अनेक चांगले बदल घडवून आणू शकतात. शिक्षकांचा समाजातील प्रत्येक घटकाशी संबंधित येतो याचा उपयोग ते सामाजिक प्रबोधनासाठी करू शकतात. शिक्षक समाजात न्याय समता बंधुता याची बीजे रुजवून लोकशाहीचा खराखुरा अर्थ लोकांना समजावू शकतात. असा संदेश योगीराज वाघमारे यांची दत्तूमास्तर ही कादंबरी देते. मास्तर आणि ग्रामीण संस्कृती, ग्रामीण भवताल यावर भाष्य करणाऱ्या बनगरवाडी तसेच रचना यांची एका वाडी ची गोष्ट सारख्या अनेक कादंबऱ्या आलेल्या असल्या तरी योगीराज वाघमारे सरांच्या दत्तू मास्तर या कादंबरीचा सामाजिक आशयाच्या दृष्टीने आलेले प्रबोधनकारी विचार हे कादंबरीचे महत्व वाढवणारे आहे.
 योगीराज वाघमारे सरांनी अजून खूप खूप लिहा व आभाळभर शुभेच्छा सह थांबते !!


छाया बेले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .