मानवी शोषणाविरुद्धचा करुण आक्रोश - हार्ट लॅम्प | बुकर पुरस्कार विजेता कथासंग्रह




मानवी शोषणाविरुद्धचा करुण आक्रोश - हार्ट लॅम्प | बुकर पुरस्कार विजेता कथासंग्रह 

लेखिका बानू मुश्ताक यांच्या ‘हार्ट लॅम्प’ या कथा संग्रहाला बुकर पुरस्काराने गौरवण्यात आले, ही भारतीय भाषांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार एका स्त्री लेखिकेला मिळावा, हे त्याहूनही अधिक अभिमानास्पद आहे. लेखिका बानू मुश्ताक यांचे हार्दिक अभिनंदन!

या कथा संग्रहात स्त्री जीवनाची अतिशय बारकाईने आणि तेवढ्याच संवेदनशीलतेने चिकित्सक मांडणी केलेली आहे. साहित्य हा मानवी जीवनाचा आरसा आहे, असे म्हटले जाते. त्या आरशातील प्रतिबिंब हे समोर उभ्या केलेल्या चित्रावर अवलंबून असते. ते चित्र जेवढे अस्सल असेल, तेवढे प्रतिबिंबही स्पष्ट असेल, हेही तितकेच खरे.

समाज, जात, धर्म हे त्या व्यक्तीच्या ‘स्व’ अस्तित्वानंतर येते. लेखिकेने समस्त स्त्री ‘स्व’ चे जगणे, तिचे शोषण, नात्यातील खोटारडेपणा, तिच्याप्रतीचे सामाजिक दंभ, मानवी व्यवहार, वृत्ती हे सगळे धीटपणे मांडले आहे. ‘कुठेही गेलं तरी पळसाला पानं तीनच’ - ‘हार्ट लॅम्प’ वाचत असताना या म्हणीचा प्रत्यय घडोघडी येतो.

 शाहिस्ता महालासाठी संगमरवरी लादी :

पहिलीच कथा ‘शाहिस्ता महालासाठी संगमरवरी लादी’ या कथेत सतत प्रेमाची शाब्दिक उधळण करणारा नवरा, बायकोवर सातवं बाळंतपण लादून ‘तू कशाला काळजी करतेस, त्यांना मी वाढवतो आहे, तेवढं कमावतो आहे मी’ असे म्हणून सगळी जबाबदारी संपूर्णपणे माझ्यावर आहे, असे दाखवून देतो. पैसे आणून दिले म्हणजेच मुलं वाढवणं असतं का? स्वतःच्या शरीराची झीज करून घेऊन स्त्री मुलं जन्माला घालते. नंतरही ती मोठी होईपर्यंत त्यांना काय हवे, काय नको, त्या सगळ्या गरजा तीच पूर्ण करते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण ती इतरांवर खर्च करते, त्याचे काहीच मोल नाही. उलट या सगळ्या गोष्टींचे श्रेय दुसरेच कोणीतरी घेत असते.

‘केवळ पैसे असणं पुरेसं आहे का? मुलं सांभाळण्यासाठी मुलीचं शिक्षण बंद करावं लागलं’ अशी खंत शाहिस्ता व्यक्त करते. ‘मीच तिचं शिक्षण थांबवलं, कारण मुलीला जास्त शिकण्याची गरज नाहीये. पुढच्या वर्षी आपण तिचं लग्न करू शकतो’ - शाहिस्ताच्या बोलण्यावर इफ्तिकार असे स्पष्टीकरण देतो. त्याच्या या बोलण्यातून समस्त भारतीय समाजाच्या मानसिकतेचे वास्तव दर्शन घडते.

शाहिस्तासाठी फुलं वेचून आणणारा इफ्तिकार तिच्या निधनानंतर एकच महिन्यात दुसरे लग्न करून तरुण पत्नी घरात घेऊन येतो.

‘जेव्हा बायको मरते तेव्हा हृदयाला होणारी जखम, कोपराला होणाऱ्या जखमेसारखी असते. कोपराला जेव्हा इजा होते तेव्हा ती जीवघेणी असते, अगदी जीवघेणी, पण क्षणभरच. नंतर त्या वेदनेचे अस्तित्व नसते. रक्त नसते, जखम नसते की काही खूणही उरलेली नसते’ - लेखिका शाहिस्ताच्या तोंडून वदवून घेतलेल्या या संवादातून पुरुषाच्या जीवनातील तिचे स्थान दर्शवते.

आईची काळजी घेत, आईच्या आईची भूमिका पार पाडणारी आसिफा, आईनंतर आपल्या भावंडांचा सांभाळ करते व वडिलांच्या सुखात कुठेही अडथळा येऊ नये याची काळजी घेते. आसिफा, शाहिस्ता आणि नंतर आलेली नववधू या स्त्रिया इफ्तिकारच्या जगण्याला सहायक ठरणाऱ्या वस्तूंसारख्या आहेत. एवढेच त्यांचे मोल आहे.

जिथे पत्नीच्या निधनानंतर पुरुषाला मुलांची काळजी घेण्यासाठी आई हवी म्हणून दुसरे लग्न करणे अनिवार्य ठरवले जाते, तिथे जर एखादी स्त्री असेल तर समाज तिला अजून जास्त बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतो. पुरुषाला जी सहानुभूती मिळते, ती स्त्रीला मिळत नाही. मुलांची आई-वडील तिनेच व्हावे व तिची व मुलांची काळजी एकटीने घ्यावी अशी अपेक्षा केली जाते. हजारो डोळे तिच्यावर नजर ठेवून असतात.

अग्नीवर्षा : राजकारणाचा विद्रूप चेहरा

‘अग्नीवर्षा’ या कथेत धूर्त लोक सामान्य माणसाला कसे भरकटवतात व आपले हेतू साध्य करून घेतात, याची मार्मिक मांडणी लेखिकेने केली आहे. या सामान्य जनात त्याचे आप्त, मित्र, परिवार सगळेच असतात.

एक पुढारी जो आपल्या बहिणीचा संपत्तीतील हिस्सा द्यायला तयार नाही, तो पुढारी सकाळीच आपल्या समस्या घेऊन आलेल्या लोकांच्या भल्या मोठ्या रांगेसमोर एक खेळी खेळतो. या पुढाऱ्याच्या हस्तकाला आपल्या मालकाला कोणत्या वेळी काय हवे आहे हे पक्के ठाऊक असते. नेमकी वेळ साधून तो आपल्या धर्माच्या व्यक्तीला दुसऱ्या धर्माच्या स्मशानात दफन केल्याची माहिती देतो. तो पुढारी त्या बातमीला धार्मिक रंग देऊन, त्याचे भांडवल करून स्वतःच्या स्वार्थासाठी कसा उपयोग करून घेतो.

आपल्या धर्माच्या माणसाला आपल्या दफनभूमीत आणून त्याला न्याय मिळवून द्यायचा आहे, तेव्हा आपले सगळे प्रश्न बाजूला ठेवून आपण माझ्या पाठीशी उभे रहा, असे भावनिक आवाहन तो करतो आणि त्याचा हेतू साध्यही होतो. सगळेजण आपल्या प्राथमिक गरजा बाजूला ठेवून देतात. आणि एक समाजकंटक, व्यसनी, चोर, गुंड असलेल्या, सगळ्यांना त्रस्त करून सोडलेल्या व्यक्तीच्या प्रेताला न्याय मिळवून देण्यासाठी उभे राहतात.

ही कथा राजकारणाचा विद्रूप चेहरा उजागर करणारी आहे. धर्मभोळ्या लोकांचा आपल्या स्वार्थासाठी कसा उपयोग करून घेतला जातो, हे लेखिकेने नेमकेपणाने मांडले आहे.

या लोकांमध्ये आपल्या पत्नीला पुढे करून संपत्तीत वाटा मागणारा पुढाऱ्याचा मेहुणा हक्क सोडून त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या खिशातील पैसे मदत म्हणून देतो. आपल्या जगण्याच्या अत्यावश्यक गरजा भागवण्यासाठी मदत मिळावी म्हणून आलेली सामान्य माणसे, सगळे गोरगरीब भावनिक आवाहनाला बळी पडतात. जवळ जेवढी रक्कम असेल तेवढी देऊन सोबत आपला पाठिंबाही देतात. नेता या सगळ्यांचे समर्थन मिळवून माहोल निर्मिती करतो.

खोटे मोर्चे, निवेदने देऊन दुसऱ्याच कुणाचे तरी कुजलेले प्रेत उकरून काढून दफन केले जाते. ती व्यक्ती मात्र जिवंत असते. तिला न्याय मिळवून दिला असे दाखवून आपला स्वार्थ साधून घेतो. लोकांच्या समस्या होत्या तशाच राहतात. राजकारण असो की सर्व स्तरांवर हेच तर होत आहे. मूळ समस्या, जगण्याशी निगडित सगळे प्रश्न बाजूला ठेवून लोकांना निरर्थक गोष्टींमध्ये गुंतवून ठेवले जाते.

या कथा संग्रहातील सर्व  कथा काळजाला स्पर्श करणाऱ्या , समाज म्हणून सर्वांना आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या आहेत. 

शोषण व्यवस्थेचे दंभ दुटप्पीपणा उघड करणारा 
‘हार्ट लॅम्प’ हा  कथासंग्रह  प्रत्येकाने वाचायलाच हवी.

@छाया बेले, नांदेड.

पुस्तक: हार्ट लॅम्प
लेखिका: बानू मुश्ताक | अनुवाद: दीपा भस्थी
पुरस्कार: आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२५

हेही वाचा 👇

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .