अर्ध्या मानवसमुहा विरोधातील सर्वात मोठे कारस्थान .
भारतीय समाजात स्त्रीविरोधी अन्यायांची चर्चा जेव्हा होते, तेव्हा बहुतांश वेळा शारीरिक हिंसा, हुंडा, कौटुंबिक छळ, लैंगिक अत्याचार किंवा सामाजिक निर्बंध यांसारख्या दृश्य अदृश्य घटनांवर कधी बोलले जाते तर जास्त वेळा दडपले जाते . सर्वच प्रश्न अत्यंत गंभीर आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करताही येणार नाही. मात्र या सगळ्या अन्यायाच्या मुळाशी असलेल्या कारणांवर चुकूनही बोलले जात नाही.
सर्व प्रकारच्या शोषणाला कारणीभूत असलेले व
या सगळ्या गोष्टींचे
आतून पोषण, करणाऱ्या मुळ कारणावर
त्यांना दीर्घकाळ टिकवून ठेवणाऱ्या आणि पिढ्यान्पिढ्या पुढे पुढे सुरूच असलेल्या अन्यायावर मौन बाळगले जाते . ती गोष्ट म्हणजे स्त्रीला मालमत्तेपासून पद्धतशीरपणे दूर ठेवणं. हीच गोष्ट स्त्रीचं संपूर्ण आयुष्य आर्थिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या असुरक्षित बनवते.
पुरूष सत्ताक व्यवस्थेने स्त्रियावर हा अन्याय परंपरेच्या नावाखाली लादला व समाज मान्यताही मिळवून घेतली . त्यामुळे शोषणाची ही कहाणी खोडणे खूप अवघड आहे.
सामाजिक नियमांच्या चौकटीत बसवला गेलेला असल्यामुळे अनेकदा अन्याय म्हणून ओळखलाच जात नाही. कुटुंबव्यवस्था, संस्कार, नातेसंबंध आणि “घर सांभाळण्याची जबाबदारी” या शब्दांच्या आड लपलेलं हे कारस्थान स्त्रीला कायम परावलंबी ठेवण्याचं प्रभावी साधन ठरत आलं आहे.
स्त्रीकडून तिचं आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं की तिचा आवाज, निर्णयक्षमता आणि विरोध करण्याची ताकद आपोआप कमी होते.
स्त्री घर उभारण्यात आयुष्य घालवते. ती केवळ स्वयंपाकघरापुरती मर्यादित नसते. शेतीत राबणं, व्यवसायात हातभार लावणं, घराचं अर्थकारण सांभाळणं, मुलांचं संगोपन करणं, वृद्धांची सेवा करणं आणि नात्यांची जपणूक करणं या सगळ्यांत तिचे श्रम मिसळलेले असतात. कुटुंबव्यवस्था चालवण्यामागची अदृश्य यंत्रणा तीच तर असते. तरीही मालकीचा प्रश्न आला की तीच स्त्री अचानक परकी ठरते. वडिलांच्या घरात ती मुलगी असते, म्हणजे तात्पुरती. लग्नानंतर नवऱ्याच्या घरात ती पत्नी असते, सगळ्या जबाबदाऱ्या उचलूनही आश्रितासारखी, कशावरही मालकी नसलेली .
वृद्धापकाळात ती आई असते, म्हणजे मुलांवर अवलंबून. ती सगळीकडे असते, पण कुठेही हक्कदार नसते. ही परिस्थिती केवळ आर्थिक विषमतेचं चित्र नाही, तर स्त्रीच्या अस्तित्वालाच दुय्यम ठरवणारी सामाजिक रचना आहे.
मालमत्ता म्हणजे फक्त जमिनीचा तुकडा किंवा घराचं कागदपत्र नाही. मालमत्ता म्हणजे आर्थिक सुरक्षितता, स्वाभिमान आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य. संकटाच्या वेळी स्वतःच्या पायावर उभं राहता येणं, अन्यायाला ठामपणे नकार देता येणं, आणि गरज पडल्यास चुकीच्या किंवा हिंसक नात्यांतून बाहेर पडता येणं, या सगळ्यां कारणांचा संबंध मालमत्तेशी भुईशी असलेल्या नात्याशी संबंधित आहे.
. ज्या स्त्रीकडे स्वतःची मालमत्ता नाही, तिच्याकडे पर्याय नसतात. पर्याय नसलेली स्त्री अनेकदा अपमान, शोषण आणि हिंसा सहन करते. तिचं मौन सहमतीचं नसतं; ते असहाय्यतेतून आलेलं असतं.
मुलींना अनेकदा सांगितलं जातं, “तुला लग्नात अमूक अमूक दिलंय. इतका हुंडा दिला . लग्न करून दिलं .” या वाक्यांतून तिचा वारसाहक्क सहज नाकारला जातो. पण दिलं म्हणजे काय, याचा कधीच सखोल विचार केला जात नाही. काही दागिने, भांडी, कपडे किंवा रोख रक्कम, जी काळानुसार झिजते, खर्ची पडते किंवा संपते. मालमत्ता मात्र उरते, वाढते आणि पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होते. मुलगा जन्मत:च वारस ठरतो, तर मुलगी जन्मत:च परकी ठरते. हा भेदभाव अपघाताने झालेला नाही. तो सामाजिक रचनेत रचला गेलेला डाव आहे. आणि आता तो
खोलवर बसलेला आहे. तोच स्त्रीला कायम दुय्यम आणि अवलंबित ठेवण्याची व्यवस्था मजबूत करतो.
स्त्रीकडून तिचा वारसाहक्क काढून घेण्यासाठी बहुतांश वेळा उघड हिंसा केली जात नाही. त्याऐवजी भावना वापरल्या जातात. “घरात भांडण होईल”, “भावंडं तुटतील”, “आईवडिलांना वाईट वाटेल”, “लोक काय म्हणतील” अशा वाक्यांच्या ओझ्याखाली स्त्री निर्णय घेते, किंवा तिला तसं करायला भाग पाडले जाते.
अनेक स्त्रिया आपला हिस्सा सोडतात, कारण त्यांना हक्क नको असतो म्हणून नाही, तर नात्यांची किंमत त्यांच्याकडून मोजून घेतली जाते. ही चोरी शांतपणे होते, म्हणून ती अन्याय वाटत नाही. मात्र तिचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. आर्थिक असुरक्षिततेसोबत मानसिक अपराधभाव आणि आत्मविश्वासाची कमतरता स्त्रीच्या वाट्याला येते.
आज स्त्रीच्या वारसाहक्कासाठी कायदे अस्तित्वात आहेत. कागदोपत्री स्त्री आणि पुरुष समान आहेत. मात्र कायदा आणि वास्तव यामध्ये मोठी दरी आहे. सामाजिक दबाव, कौटुंबिक राजकारण, आर्थिक अवलंबित्व आणि बदनामीची भीती यांमुळे अनेक स्त्रिया कायद्याचा वापर करत नाहीत. हक्क मागणारी स्त्री आजही “भांडखोर”, “स्वार्थी” किंवा “घर तोडणारी” ठरते. परिणामी गप्प बसणं हेच सुरक्षित वाटू लागतं. या मौनातूनच हे कारस्थान अधिक मजबूत होतं आणि पिढ्यान्पिढ्या पुढे जातं.
मालमत्ता नसलेली स्त्री हिंसक नात्यातून बाहेर पडू शकत नाही, वृद्धापकाळात असहाय होते आणि कुटुंबातील निर्णयप्रक्रियेतून वगळली जाते. आर्थिक स्वातंत्र्य नसल्यामुळे तिचं मत दुय्यम ठरतं. पर्याय नसलेला माणूस स्वतंत्र असू शकत नाही आणि स्वतंत्र नसलेली स्त्री सशक्त होऊ शकत नाही. त्यामुळे हा प्रश्न केवळ स्त्रीचा नसून संपूर्ण समाजाच्या न्याय्यतेचा आहे. अर्ध्या लोकसंख्येला आर्थिकदृष्ट्या दुर्बल ठेवून कोणताही समाज समताधिष्ठित, लोकशाहीवादी किंवा प्रगत होऊ शकत नाही.
बदलासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत. मानसिकता बदलणं तितकंच गरजेचं आहे. मुलीच्या नावावर मालमत्ता नोंदवणं, वारसाहक्क म्हणजे भांडण नाही तर न्याय आहे ही जाणीव समाजात रुजवणं आणि हक्क मागणाऱ्या स्त्रीला दोषी न ठरवणं आवश्यक आहे. आईने मुलीला हक्काबाबत जागरूक करणं, कुटुंबाने मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद न करणं आणि समाजाने स्त्रीच्या आर्थिक स्वातंत्र्याला प्रतिष्ठा देणं या गोष्टी अपरिहार्य आहेत. स्त्रीने स्त्रीच्या बाजूने उभं राहणंही या बदलाचा महत्त्वाचा भाग आहे.
स्त्रीला मालमत्तेपासून दूर ठेवणं हे परंपरेचे अवशेष नाहीत . किंवा ती इतिहासजमा गोष्ट नाही तर ते आजही जिवंत असलेलं, व्यवस्थात्मक आणि जाणीवपूर्वक राबवलेलं कारस्थान आहे.
जोपर्यंत स्त्री पुरुष यांच्यात भुभागाचे समान वाटप होत नाही .
तोपर्यंत समानतेची भाषा अपुरी आणि पोकळ आहे. स्त्रीचा वारसाहक्क हा कृपेचा किंवा दयेचा विषय नाही. तो तिचा मूलभूत हक्क आहे. आणि हक्क मागणं म्हणजे भांडण नव्हे, तर न्यायाची पहिली, अत्यावश्यक आणि अपरिहार्य पायरी आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा, न्याय समता मानवता हे सर्व मानव समुहासाठी आहे हे समजून घेईल.
- छाया बेले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा