स्त्री विरुद्ध स्त्री- या संकल्पनेच्या वास्तव कारणांचा विचार !!

स्त्री विरुद्ध स्त्री- या संकल्पनेच्या वास्तव कारणांचा विचार !! 
 “आपण अनेकदा ऐकतो—‘स्त्रीच स्त्रीची शत्रू असते’. पण खरंच हे सत्य आहे का?”

    मानवी समाजरचनेत स्त्रीचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण असले, तरी समाजात तिला दुय्यम दर्जा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर “स्त्री विरुद्ध स्त्री” हा जो दिसणारा संघर्ष आहे, तो केवळ वैयक्तिक मतभेदांचा किंवा स्वभाव वैशिष्ट्ये समजणे योग्य नाही, उलट, हा संघर्ष सामाजिक, सांस्कृतिक आणि संरचनात्मक घटकांनी घडवून आणलेला आहे. स्त्रिया एकमेकींविरुद्ध उभ्या राहतात ही गोष्ट प्रत्यक्षात त्या ज्या व्यवस्थेत जगतात, तिच्या मर्यादांचा आणि दबावांचा हा परिणाम होय. या लेखात स्त्री-स्त्री संघर्षाचा विचार करताना पितृसत्ताक रचना, सामाजिक संस्कार, संसाधनांची असमानता, मानसिक जडणघडण, तसेच माध्यमांच्या प्रभावाचा विचार केला आहे. त्याचबरोबर या संघर्षाच्या निराकरणासाठी काय उपाययोजना करता येतील हेही लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. पितृसत्ताक रचना हेच संघर्षाचे मूळ पितृसत्ताक समाजात सत्ता, अधिकार आणि संसाधनांवर पुरुषांचे वर्चस्व असते. स्त्रियांना मर्यादित संधी आणि अधिकार दिले जातात. अशा परिस्थितीत स्त्रियांमध्ये वरील गोष्टी मिळवण्यासाठी स्पर्धा निर्माण होते. परंतु ही स्पर्धा नैसर्गिक नसून कृत्रिमरित्या निर्माण केलेली आहे. घरगुती स्तरावर सासू-सुना, नणंद-भावजय किंवा जाऊ-जाऊ यांच्यातील संघर्ष हे याचे प्रमुख उदाहरण आहे. या नात्यांमध्ये केवळ भावनिक किंवा वैयक्तिक मतभेद नसतात, तर मर्यादित सत्तेवर नियंत्रण मिळवण्याचा संघर्ष असतो. कामाच्या ठिकाणीही हीच स्थिती दिसून येते. मर्यादित नेतृत्वाच्या संधींमुळे स्त्रियांमध्ये सहकार्याऐवजी स्पर्धा वाढते. यावरून स्पष्ट होते की स्त्री-स्त्री संघर्ष हा स्त्रियांच्या स्वभावाचा भाग नसून, पितृसत्ताक व्यवस्थेने निर्माण केलेली परिस्थिती आहे. सामाजिक संस्कार आणि अंतर्भूत पूर्वग्रह लहानपणापासूनच मुलींना विशिष्ट सामाजिक चौकटीत वाढवले जाते. “इतरांपेक्षा सुंदर दिसणे”, “घर सांभाळणे”, “इतरांच्या मान्यतेवर स्वतःची किंमत ठरवणे” अशा गोष्टी त्यांच्या मनात खोलवर रुजवल्या जातात. परिणामी, स्त्रिया सतत स्वतःची तुलना इतर स्त्रियांशी करत राहतात. ही तुलना केवळ बाह्य स्वरूपापुरती मर्यादित राहत नाही, तर शिक्षण, करिअर, नातेसंबंध आणि सामाजिक स्थान यांच्याशीही जोडली जाते. त्यामुळे असुरक्षितता, मत्सर आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. या मानसिकतेमुळे स्त्रियांमध्ये सहकार्याऐवजी स्पर्धात्मक दृष्टिकोन वाढतो. 

 संसाधनांची कमतरता व असमानता : 

स्पर्धेची पार्श्वभूमी शिक्षण, रोजगार, आर्थिक संधी आणि सामाजिक मान्यता या सर्व क्षेत्रांत स्त्रियांना समान संधी मिळत नाहीत. परिणामी, “मर्यादित संधींसाठी अधिक स्पर्धक” अशी परिस्थिती निर्माण होते. उदाहरणार्थ, एखाद्या संस्थेत नेतृत्वाच्या कमी संधी असल्यास, त्या मिळवण्यासाठी स्त्रियांमध्ये स्पर्धा वाढते. ही स्पर्धा त्यांच्या वैयक्तिक स्वभावामुळे नसून, उपलब्ध संसाधनांच्या मर्यादेमुळे निर्माण होते. जर संधींचे वितरण समान आणि व्यापक असेल, तर स्त्रियांमध्ये सहकार्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे स्त्री-स्त्री संघर्ष हा असमानतेचा परिणाम आहे, कारण नाही. अंतर्गत स्त्रीद्वेष . अंतर्गत स्त्रीद्वेष म्हणजे स्त्रियांनीच स्त्रियांविषयी नकारात्मक दृष्टिकोन स्वीकारणे. “स्त्रिया एकमेकींना खाली खेचतात”, “यशस्वी महिलेकडे 'ती तसली' असा संशयास्पद दृष्टीकोन निर्माण केला जातो. या व अशा समजुती समाजात रूढ आहेत. हे विचार वैयक्तिक अनुभवांवर आधारित नसून, सामाजिक प्रशिक्षणातून निर्माण होतात. पितृसत्ताक मूल्ये इतकी खोलवर रुजतात की स्त्रिया स्वतःच त्या मूल्यांचे समर्थन करू लागतात. यामुळे स्त्रिया एकमेकींच्या यशाकडे प्रेरणा म्हणून न पाहता, धोका म्हणून पाहतात. परिणामी, सहकार्याची भावना कमी होते.

 कौटुंबिक संरचनेतील संघर्ष 

 भारतीय समाजात स्त्री-स्त्री संघर्षाचे सर्वाधिक ठळक उदाहरण कुटुंबात दिसते. सासू-सुना संबंधात सत्ता, परंपरा आणि नियंत्रण यांचा संघर्ष असतो. सासू पारंपरिक मूल्यांचे प्रतिनिधित्व करते, तर सुनांची ओढ आधुनिकतेकडे असते. यामुळे मतभेद निर्माण होतात. असं सांगितलं जातं मात्र इथे उपलब्ध असलेल्या छोट्याशा परिघातील, म्हणजेच कुटुंबातील वर्चस्व अबाधित राखण्यासाठी हा संघर्ष असतो. बाहेरून आलेली मुलगी आपल्या मुलावर, घरावर ताबा मिळवेल, आपली किंमत कमी होईल, अशी सासुला भीती असते म्हणून ती सुनेचा द्वेष करते व तिला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करते. तसेच, नणंद-भावजय किंवा जाऊ-जाऊ यांच्यातील संघर्ष पुरूषाशी तुलना करता येत नाही, कारण पुरूष कोणत्याही नात्यात श्रेष्ठच ठरविले गेले आहेत. म्हणून आपापसात स्पर्धा करताना दिसतात. हा संघर्ष, मान-सन्मान आणि कधीकधी आर्थिक बाबींशी संबंधित असतो. ज्याला हेवेदावे म्हटले जाते. एकीला जास्त लाभ झाला तर दुसरीलाही तो हवा असतो, त्यामुळे असुया निर्माण होते. याच्या मुळाशी अगदी शुल्लक कारणेही असू शकतात. चांगली साडी, एखादा दागिना, घरातील एखादी सुविधा अशा कारणांमुळेही हा संघर्ष निर्माण होतो. या नात्यांमध्ये स्त्रियांना थेट सत्ता नसल्यामुळे त्या अप्रत्यक्ष मार्गांनी वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. उदा: जिथं अन्न, पैसा, याची कमतरता असते तिथे तो मिळविण्यासाठी माणूस जसा धडपड करतो , हा संघर्षही उणीवातून निर्माण झालेला आहे. त्याला खतपाणी घालण्याचे काम व्यवस्था करीत असते. सवतीमत्सर, जावाभावा सारखं काय हेवा देवा करताय, चार बायका एकत्र आल्या की त्या मांडल्या शिवाय राहत नाहीत असे विचार, म्हणी मुद्दाम तयार केले जातात ते मनांवर बिंबवले जातात. यात काहीही तथ्य नसते. उलट महिलांत भगिनीभाव जास्त दृढ असतो. तो जेव्हा एखाद्या महिलेला मदतीची गरज असते तेव्हा दिसून येतो.

सौंदर्य आणि शरीरराजकारण

स्त्रियांचे मूल्यांकन सौंदर्याच्या निकषांवर करणे ही सामाजिक प्रवृत्ती आहे. जुन्या काळापासून साहित्यातून स्त्रीला श्रृंगारीक रूपात दाखवले आहे. तिच्या शरिराचं बारीक सारीक तपशीलासह वर्णन करून तिचं महत्त्व केवळ सौंदर्यातच आहे असं रूजवलं गेलं. गोरीगोमटी, सडपातळ , चाफेकळी नाक, अमुक असं, तमुक तसं यावर आधारित केली जाणारी तुलना स्त्रियांमध्ये स्पर्धा निर्माण करते. या स्पर्धेत एक दुसरी पेक्षा सरस ठरण्यासाठी धडपडत असते. सौंदर्याचे हे निकष नैसर्गिक नसून सामाजिक व आधुनिक काळात ते आर्थिक हितसंबंधांशी जोडलेले आहेत. माध्यमे आणि बाजारपेठा यांनी हे बनवलेले आहेत. या निकषांना अधिक बळ देतात, महिलांच्या शरिराशी इथलं अर्थकारण जोडलं गेलं आहे. यात तीच्या देहाचं वस्तूकरण केलं गेलंय. ज्यामुळे स्त्रियांमध्ये असूया ,असुरक्षितता, न्युनगंड , सुंदर दिसण्याचं दडपण वाढत आहे. माध्यमांचा प्रभाव भरीत भर म्हणून टीव्ही मालिका, चित्रपट व सोशल मीडिया, स्त्री-स्त्री संघर्षाचे अतिरंजित चित्रण करतात. एखादी सहन करणारी सुसंस्कृत सून तिला छळणारी निर्दय सासू व इतर महिला असं दाखवलं जातं. तर कधी याच्या उलट दाखवलं जातं. सासू-सुना वाद, “कॅटफाइट” यांना मनोरंजनाचे रूप दिले जाते. यामुळे समाजात असा संदेश जातो की स्त्रियांमधील संघर्ष हा सामान्य आणि अपरिहार्य आहे. परिणामी, स्त्रियांमध्ये सहकार्याची भावना कमी होते आणि संघर्षाला वैधता मिळते. हे असंच असतं असा विचार सर्वमान्य होतो.

 कामाच्या ठिकाणी स्त्री-स्त्री संबंध

   आधुनिक काळात नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढली असली तरी आपसात परस्पर सहकार्य नेहमी दिसून येतंच असं नाही . काही वेळा वरिष्ठ स्त्रिया त्यांच्या सोबत त्यांच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या स्त्रियांना पुढे येऊ देत नाहीत.याचं कारण त्यांचं तथाकथित श्रेष्ठत्व अबाधित ठेवण्यासाठी. परंतु हे वर्तन वैयक्तिक नसून, त्यांनी अनुभवलेल्या संघर्षांचे आणि असुरक्षिततेचे प्रतिबिंब असते. जेव्हा एखादी स्त्री कठीण परिस्थितीत यशस्वी होते, तेव्हा ती आपली जागा टिकवून ठेवण्यासाठी इतरांपासून अंतर तरी ठेवते , किंवा ती इतर स्त्रियांना आपल्या बरोबरीला येण्यास पात्र समजत नाही. त्यामुळे संघर्ष निर्माण होतो.

 स्त्री-स्त्री संघर्षामागील असुरक्षितता,

आत्ममूल्याची कमतरता आणि मान्यतेची गरज हे महत्त्वाचे घटक असतात. या भावना वैयक्तिक नसून सामाजिक अनुभवांमधून तयार होतात. जेव्हा व्यक्तीचे आत्ममूल्य बाह्य मान्यतेवर अवलंबून असते, तेव्हा ती इतरांच्या यशाला धोका म्हणून पाहते. त्यामुळे सहकार्याऐवजी स्पर्धा वाढते. स्त्री-एकजुटीचा अभाव आणि त्याचे परिणाम स्त्रियांमध्ये एकजूट नसल्यास सामाजिक बदलाची प्रक्रिया मंदावते. स्त्री हक्कासाठी काम करत असलेल्या चळवळी कमकुवत होतात व अन्याय टिकून राहतो. याउलट, जेव्हा स्त्रिया एकत्र येतात, तेव्हा सामाजिक परिवर्तनाची गती वाढते. इतिहासात अनेक उदाहरणे आहेत जिथे स्त्रियांच्या एकजुटीमुळे मोठे बदल घडून आले आहेत. सकारात्मक बदल आणि उदाहरणे, स्वयं-सहायता गट, महिला बचत गट, शिक्षण आणि सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून स्त्रिया एकमेकींना साथ देताना दिसतात. या प्रक्रियेमुळे आत्मविश्वास वाढतो, आर्थिक स्वावलंबन मिळते आणि सहकार्याची संस्कृती विकसित होते. ग्रामीण भागात महिला बचत गटांनी आर्थिक सक्षमीकरणासोबतच सामाजिक परिवर्तन घडवून आणले आहे. शहरी भागातही स्त्रियांच्या नेटवर्किंगमुळे व्यावसायिक प्रगतीला चालना मिळत आहे. हा बदल येणाऱ्या काळात नक्कीच आशादायी ठरेल.

 
    स्त्री-स्त्री संघर्ष कमी करण्यासाठी खालील उपाय आवश्यक आहेत. 

लिंगसमानतेवर आधारित शिक्षण : लहानपणापासून समानतेचे मूल्य रुजवणे आवश्यक आहे. आर्थिक स्वावलंबन : स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो. सकारात्मक माध्यमप्रतिमा : सहकार्य आणि एकजुटीचे चित्रण वाढवणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य जागरूकता : असुरक्षितता आणि ताण यावर योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. संवाद आणि सहकार्य वाढवणे : स्त्रियांमध्ये परस्पर समज आणि सहकार्य वाढवण्यासाठी मंच निर्माण करणे आवश्यक आहे. निष्कर्ष “स्त्री विरुद्ध स्त्री” हा संघर्ष नैसर्गिक नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि संरचनात्मक प्रक्रियांचा परिणाम आहे. पितृसत्ताक व्यवस्था, मर्यादित संसाधने, सामाजिक संस्कार आणि अंतर्गत पूर्वग्रह यामुळे हा संघर्ष निर्माण होतो. या समस्येचे निराकरण वैयक्तिक स्तरावर शक्य नाही; त्यासाठी व्यापक सामाजिक परिवर्तन आवश्यक आहे. स्त्रिया एकमेकींच्या विरोधात नव्हे, तर सोबत उभ्या राहिल्यासच समानतेवर आधारित समाजरचना घडू शकते. स्त्री-एकजूट ही केवळ भावनिक संकल्पना नसून सामाजिक न्याय आणि प्रगतीसाठी अत्यावश्यक अट आहे. त्यामुळे “स्पर्धा” पासून “सहकार्य” कडे जाणे हीच खरी प्रगती ठरेल. थोडक्यात काय तर, विरुद्ध स्त्री ही संकल्पना मोडून ‘स्त्री सोबत स्त्री’ हा दृष्टिकोन रुजवणे हीच खरी सामाजाची गरज आहे.

 अजून एक गोष्ट महिलांसाठी - महिला कोणत्याही जातीत, किंवा कोणत्याही धार्मिक समुहात जन्माला आलेली असेना, तिला केवळ महिलेला जे नियम आहेत त्यानुसारच वागणूक दिली जाते. स्त्रीयांना जो अन्न वस्त्र निवारा मिळतो तो त्यांच्या उपयोगीतेमुळे मिळतो. त्यांच्या अविरतपणे केलेल्या श्रमाच्या मोबदल्यात मिळतो. माणूस म्हणून त्यांचा अधिकार समाज त्यांना देत नाही. त्यांची माणूस म्हणून प्रतिष्ठा स्विकार केली जात नाही. त्यामुळे महिलांनी या गोष्टींचा अभिमान बाळगण्याची गरज नाही. त्यांची जात धर्म केवळ स्त्री असणं होय. हे लक्षात घेऊन स्त्रियांनी स्त्रीच्या सक्षमीकरणासाठी हातभार लावणे आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला साथ देणं आवश्यक आहे. महिलांचं अर्ध जग अजूनही आपल्या अधिकारापासून वंचित आहे , याचं कारण महिलांतील एकजुटीचा अभाव. याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तुमच्या अनुभवात स्त्रियांमध्ये स्पर्धा जास्त दिसते की सहकार्य? तुमचं मत नक्की सांगा. 

 - छाया

हेही वाचा -





टिप्पण्या

  1. *छाया बेले जी*

    *स्त्री विरुद्ध स्त्री* ह्या विषयावर आपण लिहिलेल्या आपल्या लेखात पितृसत्ताक हे कारण दिलेलं असलं तरी माझ्या मते खूप खोलवर विचार केला तर आजवरच्या काही स्वार्थी लोकांनी सुरू ठेवलेले प्रघात आणि पुरुष आणि स्त्री ह्या दोन्ही बाजूत कुणातही समानतेची भुमीका असायला हवी ही स्वाभाविक वृत्ती नाही त्यामुळे हे असंच चालत आलं आहे आणि वर्चस्व स्थापित झालेल्या लोकांमुळे पुढेही असंच चालू राहणार आहे , हां तसं होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू तर राहतील पण सामाजिक , जिवीत , आर्थिक हानी होत राहिल , हे नाकारता येणार नाही ,
    आपले लेखन समाजाच्या हिताचे
    सत्कारणी आणि वैचारिक चिंतन गर्भ असते , त्यावर चर्चा उप चर्चा होणं आवश्यक आहे , शुभेच्छा आहेतच , धन्यवाद 🙏
    ~~~~~~~~~~~~~ निर्मोही ,

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .