ऑनलाइन जवळ, मनाने दूर – सोशल मीडियाचं वास्तव


सोशल मीडियामुळे नात्यांमध्ये वाढलेलं अंतर - आत्मचिंतन

मानवी नातेसंबंध हे केवळ रक्ताच्या किंवा सामाजिक बंधनांवर आधारित नसतात, तर ते संवाद, विश्वास, समज आणि भावनिक गुंतवणूक यावर आधारलेले असतात. हे गुण असतील तरच नाती दृढ व अतूट होतात.
पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात साधनं नव्हती. आपला सीमित भोवताल हेच आपलं जग होतं. तेव्हा नात्यांमध्ये मायेची उब, जिव्हाळा, परस्परांच्या सुखदुःखाची जाण होती. सहा महिने किंवा वर्षाला आलेलं एखादं पत्र या हृदयातील भाव त्या हृदयापर्यंत पोहोचवत असे. तेव्हा माणसात आपुलकीची ओढ होती. अधूनमधून प्रत्यक्ष भेटीत एकत्र बसून मनसोक्त गप्पा व्हायच्या. यामुळे नात्यांची वीण अधिक घट्ट होत असे. माणसाची जागा माणसासाठीच राखीव होती.
मात्र एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाने मानवी जीवनाचा चेहरामोहरा आमूलाग्र बदलून टाकला. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या प्रसारामुळे सोशल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. या माध्यमांनी जगाला “ग्लोबल व्हिलेज” बनवलं. अभासी माध्यमांनी जगभरातील माणसं जोडली गेली. माणसा-माणसांतील अंतर कमी केलं. संवाद सुलभ केला.
“माणसं जोडली गेली असली तरी, हृदयाने जवळ आलीत का?”
आतील ओढ, जिव्हाळा, काळजी हेही अभासी होत चाललंय की काय, अशी शंका येते. की माणूस आधीपासूनच असा होता?
आजचा मनुष्य ऑनलाइन हजारो लोकांशी जोडलेला असतो, पण घरातील मोजक्या लोकांशी मनमोकळा संवाद साधायला वेळ काढू शकत नाही. हा विरोधाभास केवळ कोणा एकाच्या अनुभवापुरता मर्यादित नसून संपूर्ण मानवी समाज या एकाच परिस्थितीत अडकून पडला आहे. या लेखात सोशल मीडियामुळे नात्यांमध्ये वाढलेल्या अंतराचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे जीवनशैलीतील आमूलाग्र बदल झाले आहेत. अवघ्या दशकभरात सोशल मीडियाचा वापर अतिशय वेगाने वाढला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब सारख्या माध्यमांनी केवळ संवादाची पद्धतच बदलली असं नाही, तर विचार करण्याची, स्वतःकडे पाहण्याची आणि इतरांना समजून घेण्याची—किंवा समजून न घेण्याची—दृष्टीही बदलली आहे. माणूस कधी नव्हता एवढा आत्ममुग्ध होत चालला आहे.
“इस जमीन से आसमां तक मैं ही मैं हूँ”
आजच्या माणसाला ही ओळ नेमकी लागू होते. आज प्रत्येक क्षण जगण्यासाठी नाही, तर “शेअर” करण्यासाठी आहे, असा आपला समज झाला आहे. आपण कुठे जातो, काय खातो, कोणाला भेटतो—हे सगळं सोशल मीडियावर शेअर केलं जातं. जीवन जगण्यापेक्षा ते “दाखवण्याची” प्रवृत्ती वाढली आहे.
याचं कारण सोशल मीडियावर तात्काळ प्रतिक्रिया मिळतात, याचं क्षणिक समाधान असतं. माणसाची श्रेष्ठत्वाची भूक भागवली जाते. अर्थात हे शेजीबाईचं उसणं असतं—ज्यानं हे समाधान दिलं, त्याला पुढच्या क्षणी ते परत करावं लागतं. पोस्टवर मिळणारे लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स तात्पुरता आनंद देणारे असतात. हा आनंद मिळवण्यासाठी माणूस धडपडत असतो. पुढे तो कायम या आभासी मान्यतेवर अवलंबून राहू लागतो.
सोशल मीडियावर मिळणारी मान्यता व्यक्तीला तात्पुरता आनंद देते. हळूहळू ही मान्यता आवश्यक वाटू लागते. परिणामी, व्यक्ती स्वतःचं मूल्य बाह्य प्रतिसादावर ठरवू लागते. वास्तविक नात्यांतील प्रेम आणि स्वीकार यांचं महत्त्व कमी होतं. ही मानसिकता नात्यांमध्ये भावनिक अंतर निर्माण करते.
वास्तविक भावनिक समाधानाकडे दुर्लक्ष होत आहे. माणसाला आज अनेक अभासी पर्याय उपलब्ध आहेत. ते सगळेच पकडायचा तो प्रयत्न करत आहे. एखाद्या लहान मुलाला खेळण्याच्या दुकानात मोकळं सोडावं, अशी माणसाची अवस्था झाली आहे. निवडीची समज विकसित झालेली नाही. समोर साधनांची अमर्याद उपलब्धता आहे. त्यामुळे माणूस गोंधळून गेला असं म्हणण्यापेक्षा तो हरवून गेला असं म्हणणं योग्य राहील. अभासी झगमगाटात त्याच्या जवळ जे मौल्यवान—वेळ, नाती, जीवन—आहे ते सगळंच दुय्यम ठरू लागलं आहे.
याच टप्प्यावर नात्यांमध्ये अंतर निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. ते जरी दिसत नसले तरी हळूहळू मनाच्या पातळीवर नात्यातील दरी वाढत आहे.
नात्यांमध्ये वाढणाऱ्या अंतराची अनेक कारणं आहेत.
उदा: आभासी गुंतवणूक आणि घरात प्रत्यक्ष संवादाची घट.
सोशल मीडियामुळे व्यक्तीचा मोठा वेळ स्क्रीनसमोर जातो. कुटुंबासोबत बसतानाही प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो. पूर्वी एकत्र बसणं म्हणजे संवाद, हसू आणि अनुभवांची देवाणघेवाण असायची; आज एकत्र असूनही ही देवाणघेवाण वजा झाली आहे, असं वाटतं.
शारीरिक जवळीक असली तरी मानसिक आणि भावनिक अनुपस्थिती वाढलेली आहे.
संवाद हा नात्यांचा प्राण आहे. तो कमी झाला की नात्यांची वीण विस्कळीत होणं स्वाभाविक आहे. कुटुंबातील कुणाला काही सांगायचं असतं, एखाद्या समस्येवर उपाय हवा असतो, कधी केवळ ऐकून घेणं पुरेसं असतं. कधी आश्वासक दृष्टीने पाहणं आवश्यक वाटतं, तर कधी आधाराचा धीर देणारा स्पर्श हवा असतो. आपलं माणूस सोबत असताना पूर्णपणे तनामनाने उपस्थित असावं—एवढीच अपेक्षा असते; मात्र सध्या हेच होत नाही.
यामुळे घरातील वस्तू आणि माणसं यातील फरक संपुष्टात येत चालला आहे, असं वाटतं. याचमुळे नात्यातील ओल आटत चालली आहे. आतली अस्वस्थता वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून पुन्हा सोशल मीडिया—असं हे चक्र सुरू आहे.
सोशल मीडियातून होणारी तुलना, त्यामुळे निर्माण होणारी असमाधानाची भावना हेही तणाव वाढवणारे घटक आहेत. सोशल मीडियावर लोक आपलं आयुष्य निवडक आणि आकर्षक पद्धतीने मांडतात. इतरांच्या जीवनातील यश, आनंद आणि सुंदर क्षणच जास्त दिसतात; संघर्ष आणि वास्तव लपून राहतं.
हे पाहणाऱ्या व्यक्तीच्या मनात तुलना सुरू होते—“त्यांचं आयुष्य इतकं चांगलं, मग माझं का नाही?” अशा विचारांमुळे मनात बेचैनी निर्माण होते. याचा परिणाम नात्यांवर होतो. अपेक्षा वाढतात, समाधान कमी होतं आणि तणाव वाढतो.
संवादाची गुणवत्ता कमी झाली, हाही एक सोशल मीडियाचा दुष्परिणाम आहे. डिजिटल संवाद वेगवान आहे, मात्र तो अपूर्ण आहे. इमोजी, शॉर्ट मेसेज, स्टेटस अपडेट्स या माध्यमांतून भावना पूर्णपणे व्यक्त होत नाहीत. जशा प्रत्यक्ष संवादात आवाजातील चढ-उतार, चेहऱ्यावरील भाव आणि स्पर्शातून भावना व्यक्त होतात, ते महत्त्वाचे घटक डिजिटल संवादात अनुपस्थित असतात.
यामुळे गैरसमज निर्माण होतात—“त्याने उत्तर दिलं नाही”, “ती ऑनलाइन असूनही बोलली नाही” अशा छोट्या गोष्टी नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतात.
सोशल मीडियामुळे नात्यांमध्ये अनावश्यक निरीक्षण आणि संशय वाढतो. लास्ट सीन, ऑनलाइन स्टेटस, लाइक्स, कमेंट्स यांसारख्या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातं. या निरीक्षणातून शंका निर्माण होते, संशय बळावतो आणि विश्वास कमी होतो. नात्यातील आपसी समज व स्वातंत्र्य हरवतं. नियंत्रण आणि संशय वाढतात, जे कोणत्याही नात्यासाठी घातक आहे.
वेळेचं असंतुलन आणि प्राधान्यक्रमातील बदल होतात. सोशल मीडियामुळे वेळेचं व्यवस्थापन बिघडतं. कुटुंब, संवाद आणि विश्रांती यांना कमी वेळ मिळतो, तर स्क्रीनला अधिक प्राधान्य दिलं जातं. नात्यांना वेळ देणं अत्यावश्यक असतं. वेळ न दिल्यास नातं हळूहळू कमकुवत होतं—हे अंतर अचानक निर्माण होत नाही; ते नकळत वाढत जातं.
नात्यात भावनिक दुरावा निर्माण होतो. दोन व्यक्ती एकत्र असूनही मनाने दूर होत जातात. सोशल मीडियामुळे माणसाची स्थिती ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. त्यामुळे एकटेपणा वाढत आहे. अनेक लोकांमध्ये असूनही एकटं वाटणं हा सोशल मीडियाचा परिणाम आहे.
तुलना आणि अपेक्षांमुळे तणाव वाढणं, नात्यांची खोली कमी होणं, कुटुंबातील संवाद कमी होणं—हे परिणाम आजच्या समाजाची गंभीर समस्या बनत आहेत.
या सगळ्या नकारात्मक बाजूंप्रमाणेच काही सकारात्मक बाजूही आहेत. प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात. आपण साधनाचा वापर कसा करतो, यावर ते अवलंबून आहे.
योग्य वापर केल्यास सोशल मीडियाचे फायदेही आहेत:
दूर राहणाऱ्या व्यक्तींशी संपर्क ठेवता येतो,
ज्ञान आणि माहिती सहज उपलब्ध होते,
सामाजिक जागरूकता वाढते,
अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध होतं. (मात्र लाईक, कमेंटच्या नादात जे अस्सल निर्माण होऊ घातलेल्याचा अंकूर सुकून जाण्याची शक्यता आहे.)
म्हणूनच समस्या सोशल मीडियामध्ये नसून, त्याच्या असंतुलित वापरामध्ये आहे.
दररोज काही वेळ मोबाईलपासून दूर राहणं आवश्यक आहे. आठवड्यातून एक दिवस सोशल मीडिया न वापरण्याची सवय लावणं उपयुक्त ठरतं.
समोर बसून बोलणं, एकत्र वेळ घालवणं आणि अनुभव शेअर करणं—यामुळे नात्यांची उब टिकून राहते.
सोशल मीडियावर दिसणारं जीवन पूर्ण सत्य नसतं, हे समजून घेऊन आपल्या आयुष्याची किंमत ओळखणं महत्त्वाचं आहे.
विश्वास आणि पारदर्शकता वाढवणं आवश्यक आहे. नात्यांमध्ये मोकळेपणाने संवाद साधणं आणि एकमेकांवर विश्वास ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे.
सोशल मीडियासाठी मर्यादा ठरवणं, वेळेचं योग्य नियोजन करणं, नात्यांना प्राधान्य देणं—ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर आत्मपरीक्षण करून आपल्या सवयी, मीडियाचा वापर आणि त्याचा परिणाम यांचा विचार करून संतुलन साधणं शक्य आहे.
सोशल मीडिया हे आधुनिक युगाचं प्रभावी साधन आहे. त्याने जग जवळ आणलं, अनेक गोष्टी सोप्या केल्या असल्या तरी मनांमध्ये अंतर निर्माण केलं, हे वास्तव नाकारता येत नाही.
नात्यांची खरी ताकद ही स्क्रीनच्या प्रकाशात नसून, प्रत्यक्ष संवादात, प्रामाणिक भावनांमध्ये आणि एकमेकांच्या सहवासात आहे.
आजची खरी गरज आहे ती संतुलन साधण्याची—आभासी आणि वास्तव जग यामध्ये योग्य समतोल राखण्याची. सोशल मीडिया आपल्या जीवनाचा भाग असावा, पण तो केंद्रबिंदू होऊ नये.
नात्यांना वेळ द्या, संवाद वाढवा आणि विश्वास जपा; कारण शेवटी लाईक्स आणि कमेंट्स नाही, तर माणसं आपल्या आयुष्याला अर्थ देतात.
“आपण ऑनलाइन खूप जवळ आलोय, मात्र मनाने एकमेकांपासून दूर जातोय हे लक्षात घ्यायला हवं.”
— छाया

लिंक वर क्लिक करून हेही वाचा -





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .