कुटुंबातील भावनिक अंतर : एकाच घरात राहूनही दूर होत चाललेली माणसं
कुटुंबातील भावनिक अंतर : एकाच घरात राहूनही दूर होत चाललेली माणसं
जगाच्या पाठीवर आपलं घर असणारी व्यक्ती भाग्यवान समजायला हवी. घराचं महत्व त्यांना माहीत असतं ज्यांचं कुठेही घर नाही. मात्र ज्यांना घर आहे त्यात घरपण असेलच असे नाही.
'घर' या शब्दाचा अर्थ केवळ दगड विटांच्या चार भिंती असा होत नाही,
घर म्हणजे जगाच्या पाठीवर आपलं हक्काचं सुरक्षित ठिकाण असतं. त्यात राहणाऱ्या माणसांमधील जिव्हाळा, संवाद, समजूतदारपणा आणि भावनिक आधार या गोष्टी घराला घरपण देतात. घर ही अशी जागा असते, जगात कुठेही गेलो, पद, प्रतिष्ठा, कितीही मान मरातब मिळवला तरीही मनाला कायम घरी परतण्याची ओढ असते. घर अशी जागा असते जिथे आपण सुखाची झोप घेऊ शकतो. हे घरपण अलिकडे खिळखिळं होत चाललं आहे.
पूर्वी कुटुंबातील सर्व लहान मोठी माणसं एकमेकांशी प्रत्यक्ष जोडून होती.
सगळेजण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे, एकत्र बसून मनमोकळ्या गप्पा व्हायच्या, खळखळून हसायचे, खरा हृदय संवाद व्हायचा.
सगळं आलबेल होतं असं नाही, त्यांच्यातही भांडणं व्हायची, रुसवे-फुगवे व्हायचे, मात्र आपसातील आपलेपण कायम असायचं. ते भांडण दोन व्यक्तीतील नसायचं तर ते दोन नात्यातील असायचं आणि हे नातंच पुन्हा सगळं विसरून एकत्र येण्यास मदत करायचं.
आणि याला कारणही त्या घराचं घरपण, आपसातील जिव्हाळा असायचं !!
मात्र आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगात एक विचित्र वास्तव दिसत आहे.
एकाच घरात राहणारी माणसं मनाने मात्र एकमेकांपासून दूर होत चालली आहेत.
आज जवळपास सर्वच घरांमध्ये आधुनिक सोयी,सुविधा आहेत, पण संवाद नाही.
एकत्र राहत असुनही आपलेपणा नाही.
काळजी आहे, पण ती व्यक्त करण्यासाठी वेळ नाही. हळूहळू कुटुंबात एक अदृश्य भावनिक भिंत उभी राहत आहे . नात्यांमधील मायेची ऊब कमी होत चालली आहे.
कुटुंबात भावनिक अंतर निर्माण होत आहे.
भावनिक अंतर म्हणजे नेमकं काय?
भावनिक अंतर म्हणजे दोन व्यक्तींमध्ये किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये भावना, विचार आणि मनातील गोष्टी शेअर करण्याची कमी होत जाणारी क्षमता. हे अंतर नेहमी भांडणातूनच निर्माण होतं असं नाही. अनेकदा काही न बोलता नाती तुटत असतात. म्हणजेच संवादाचा अभाव हा नाते दुरावण्यास कारणीभूत ठरतो.
एखाद्या घरात सर्व जण एकत्र राहतात, रोज भेटतात, बोलतातही; पण तरीही कुणालाच कुणाचं मन कळत नाही. कोणाच्या मनात दुःख आहे, कोण तणावात आहे, कोणाला आधाराची गरज आहे . हे समजून घेण्याची संवेदनशीलता कमी होऊ लागते. अशावेळी घरात माणसं असतात, पण मनाला घरपण जाणवत नाही.
कुटुंबात भावनिक अंतर निर्माण होण्याची प्रमुख कारणं म्हणजे,
'संवादाचा अभाव'
कोणत्याही नात्याचा पाया संवाद असतो. पण आज अनेक घरांमध्ये संवाद फक्त आवश्यक गोष्टींपुरता मर्यादित राहिला आहे. “जेवलास का?”, “कधी येणार?”, “हे काम कर” एवढ्यापुरतंच बोलणं होतं.
मनातील भीती, ताण, अपेक्षा, दुःख किंवा आनंद शेअर करण्यासाठी जागाच उरलेली नाही. एकमेकांना ऐकून घेण्याची सवय कमी होत हरवत चालली आहे.
परिणामी गैरसमज वाढतात आणि मनात कधी न मिटणारी दरी निर्माण होते.
कुटुंबात भावनिक अंतर निर्माण होण्याची प्रमुख कारणांपैकी अजून एक कारण म्हणजे,
मोबाईल आणि सोशल मीडियाचं अतिरेकी जग !
आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, पण एकमेकांचा हात हातात घ्यायला वेळ नाही. तो प्रेमाचा , आधाराचा स्पर्श, न बोलताही तू माझ्यासाठी महत्वाचा/महत्वाची आहेस हे त्या स्पर्शाने जाणवून देण्याची घेण्याची क्षमता हरवत चालली आहे.
कुटुंबातील सदस्य एकाच खोलीत बसलेले असतात, पण प्रत्येकाचं लक्ष वेगवेगळ्या स्क्रीनमध्ये हरवलेलं असतं.
आजचा माणूस सोशल मीडियावर हजारो लोकांशी जोडला गेलेला असला तरी घरातील माणसांशी संवाद होत नाही. आभासी जगात रमलेल्या माणसांना वास्तवातील नाती जपण्यासाठी आवश्यक असलेला वेळ आणि भावनिक गुंतवणूक कमी पडत आहे.
आधुनिक काळात व्यस्त जीवनशैली,
वाढता ताणतणाव हाही कुटुंबात भावनिक अंतर निर्माण होण्यास जबाबदार आहे.
आजच्या काळात प्रत्येक जण काम, करिअर, शिक्षण आणि आर्थिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेला आहे. दिवस संपेपर्यंत शरीर थकलेलं असतं आणि मनालाही विश्रांती हवी असते. अशा वेळी कुटुंबासाठी वेळ देण्याची उर्जा शिल्लक राहत नाही.
आई-वडील कामात व्यस्त, मुलं अभ्यासात किंवा मोबाईलमध्ये, वृद्ध पालक एकाकी — अशा परिस्थितीत घरात भावनिक दुरावा वाढू लागतो. पैसा वाढतो, सुविधा वाढतात; पण नात्यांमधील जवळीक कमी होत जाते.
कुटुंब, नाते म्हटलं की अपेक्षा आल्याच.
प्रत्येक नात्यात काहीतरी अपेक्षा असतातच. आपल्याला समजून घ्यावं, वेळ द्यावा, प्रेम व्यक्त करावं. आपल्या गरजांना महत्व द्यावं.
ही प्रत्येक माणसाची नैसर्गिक गरज आहे. पण जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. किंवा त्या अपेक्षांची उपेक्षा केली जाते तेव्हा मनात नाराजी साचू लागते.
लहान गैरसमज वेळेवर दूर झाले नाहीत तर ते हळूहळू मोठ्या दुराव्यात बदलत जातात. अनेकदा लोक बोलणं कमी होत जातं, मनातील अंतर वाढत राहतं.
त्याचबरोबर आपण केलेल्या कामाचं आपल्या माणसांना कौतुक असावं
आपल्या माणसांकडून कौतुकाची थाप मिळावी.
हेही अपेक्षित असतं, अर्थात कुटुंब सपोर्टिव असावं अशी अपेक्षा असते. मात्र 'याने काय होतं' 'हे काय कामाचं'
'हे काही एवढं मोठं यश नाही', दरवेळी कुटुंबातील सदस्यांकडून अशा वाक्यांनी मिळविलेल्या यशाचा, कर्तृत्ववाचा ,
भावनांचा अनादर केला जातो.
त्याला महत्त्व दिलं जात नाही. जेव्हा एखाद्याच्या भावना सतत दुर्लक्षित केल्या जातात, तेव्हा तो व्यक्तीच्या मानाची दारं हळूहळू बंद व्हायला लागतात.
भावनिक आधाराची गरज प्रत्येकाला असते. पण जेव्हा घरातच आपल्याला समजून घेतलं जात नाही, तेव्हा माणूस आतून एकटा पडतो.
भावनिक अंतर निर्माण होते.
त्याचे परिणाम म्हणून,नात्यांमध्ये दुरावा निर्माण
भावनिक अंतर वाढलं की नात्यांमध्ये आपुलकीची ऊब, प्रेम ,काळजी जाणवत नाही. अशा वेळी एकाच घरात राहूनही माणसं एकाकी पडतात.
याचे मानसिक आरोग्यावर परिणाम होतात.
सतत दुर्लक्षित केलेल्या व्यक्तीमध्ये नैराश्य, असुरक्षितता, चिडचिड आणि भावनिक थकवा वाढू शकतो. घर जर मानसिक आधार देत नसेल, तर बाहेरच्या जगात हे मिळवण्यासाठी माणूस धडपडतो. अनेकदा त्याची गरज ओळखून त्याचा फायदा घेतला जातो.
अशा दुभंगलेल्या नात्यांचा घरातील लहान मुलांवर नकारात्मक परिणाम होतो.
मुलं घरातील वातावरणातूनच नाती शिकतात. जर घरात संवादाचा अभाव, ताण किंवा भावनिक दुरावा असेल तर त्याचा परिणाम मुलांच्या स्वभावावर आणि मानसिक विकासावर होतो.
अशा मुलांना भावना व्यक्त करणं, नाती टिकवणं किंवा इतरांना समजून घेणं कठीण जाऊ शकतं.
मुलांना भावनिक सुरक्षा ,आधार मिळत नाही. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो.
कुटुंबातील वृध्द पालकांना आर्थिक सुविधांपेक्षा भावनिक आधाराची अधिक गरज असते. पण आज अनेक वृद्ध व्यक्ती घरात असूनही दुर्लक्षित वाटतात. त्यांच्याशी बोलण्यासाठी, त्यांना ऐकून घेण्यासाठी कुणाकडे वेळ नसतो. ही भावनिक उपेक्षा त्यांना आतून खूप दुखावते.
हे सगळं टाळून कुटुंब पुन्हा जवळ आणण्यासाठी काय आवश्यक आहे?
* संवादाची नव्याने सुरुवात करणं आवश्यक आहे
नातं वाचवायचं असेल तर संवाद आवश्यक आहे. फक्त बोलणं नाही, तर एकमेकांना मनापासून ऐकून घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाला स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी कुटुंबात सुरक्षित जागा मिळाली पाहिजे.
यासाठी एकत्र वेळ घालवणं आवश्यक आहे.
दररोज थोडावेळ मोबाईल तसेच कामं यापासून दूर राहून कुटुंबासोबत राहणं खूप महत्त्वाचं आहे. एकत्र जेवण, गप्पा, छोट्या सहली किंवा साधा एकत्र बसून घेतलेला चहा अशा क्षणांमधूनच नाती पुन्हा जिवंत होतात, पुन्हा फुलतात.
त्याचबरोबर आपल्या मनातील
भावना व्यक्त करणंही तेवढंच आवश्यक आहे.
मी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतो मग माझं कर्तव्य संपलं असं म्हणून चालत नाही तर,
आपल्याला आपल्या माणसांवर प्रेम आहे हे फक्त मनात ठेवून उपयोग नाही; ते व्यक्तही करता आलं पाहिजे. “तू महत्त्वाचा आहेस”, “मला तुझी काळजी आहे” ही छोटी वाक्यं नात्यांना खूप बळ देतात.
कुटुंबात सौख्य वाढविण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीं सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात.
कौतुक, विचारपूस, सहानुभूती, एखाद्या थकलेल्या व्यक्तीसाठी केलेली छोटी मदत या साध्या गोष्टी नात्यांमध्ये मोठी ऊब निर्माण करतात.
अहंकार बाजूला ठेवणं आवश्यक आहे.
अनेक नाती “कोण आधी बोलणार?” या अहंकारात तुटतात. प्रत्येक वेळी जिंकणं महत्त्वाचं नसतं; काही वेळा नातं टिकवण्यासाठी स्वतःहून पुढे येणं आवश्यक असतं.
आधुनिक काळातील कुटुंबव्यवस्था आणि बदल
पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे माणसांमध्ये संवाद आणि सहभाग अधिक होता. आज विभक्त कुटुंब पद्धती, शहरातील धावपळ आणि डिजिटल जीवनामुळे नात्यांचं स्वरूप बदलत चाललं आहे.
तंत्रज्ञानाने सुविधा दिल्या, पण अनेकदा माणसांमधील भावनिक जवळीक कमी केली. त्यामुळे आज नाती टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज अधिक आहे.
कुटुंबाची व्याख्या फक्त एकत्र राहण्यात नसते; ते एकमेकांच्या मनात राहण्यात असते. भावनिक जवळीक ही कोणत्याही नात्याची खरी ताकद असते. संवाद, समजूतदारपणा, वेळ आणि संवेदनशीलता यांच्याशिवाय कोणतंही नातं जिवंत राहू शकत नाही.
आज प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारण्याची गरज आहे , आपण आपल्या माणसांसोबत खरंच जोडलेलो आहोत का, की फक्त एकाच घरात राहत आहोत?
कारण नाती तुटायला मोठी कारणं लागत नाहीत; अनेकदा अबोला, संवादाची उणीव,
थांबणंही पुरेसं असतं.
- छाया
जरूर वाचावे असे लेख
👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा