समज हरवलेल्या स्त्रीयांची गोष्ट | मराठी लेख
समज हरवलेल्या स्त्रीयांची गोष्ट
स्त्री ही भावनांनी समृद्ध असते, संवेदनशील असते, दुसऱ्यांच्या वेदना सहज ओळखू शकते मात्र इतकी भावनिक समज असलेली स्त्री अनेकदा दुसऱ्या स्त्रीलाच समजून घेण्यात कमी पडते.
स्त्रियांच्या नात्यांमध्ये गैरसमज, तुलना, टोमणे, स्पर्धा आणि एक अदृश्य भावनिक अंतर इतकं का दिसून येतं?
हा प्रश्न अनाकलनीय वाटत असला तरी त्याचं उत्तर आपल्या समाजव्यवस्थेत, कुटुंब व्यवस्थेत दडलेले आहे.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे असं म्हटलं जातं.
मात्र माणसातील भेदभाव, द्वेष, शारिरीक, भावनिक हिंसा पाहता माणसाच्या सामाजिक असण्यात कुठेही तथ्य दिसून येत नाही. माणसाने माणसाला एकमेकापासून तोडण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व करून ठेवले आहे. जातीभेद, वर्णभेद , वर्गभेद ,धर्मभेद लिंगभेद, हे ठळक दिसून येतात. दिसून न येणारे भेद
हे फक्त सासू–सून किंवा दोन स्त्रियांच्या वैयक्तिक मतभेदांपुरतं मर्यादित नाही. तर ते समाजाच्या मानसिकतेशी, स्त्रीच्या संगोपनाशी, तिच्या भावनिक गरजांशी आणि अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या अनुभवांशी जोडलेले आहे.
म्हणूनच “स्त्रिया अशाच असतात” असं म्हणून हा विषय संपत नाही. उलट, त्या अशा का घडल्या की घडवल्या गेल्या, हे समजून घेणं अधिक आवश्यक ठरतं.
समजून घेण्याआधी तुलना शिकवली जाते
मुलींना लहानपणापासून सहजीवनापेक्षा तुलना जास्त शिकवली जाते. “ती तुझ्यापेक्षा हुशार आहे”, “तिच्यासारखं वाग”, “तिचं रूप बघ”, “ती किती समजूतदार आहे” — अशा वाक्यांमधून नकळत स्पर्धेची बीजं रुजवली जातात. एका मुलीचं कौतुक करताना दुसऱ्या मुलीला कमी लेखलं जातं.
ही तुलना केवळ शिक्षणापुरती मर्यादित राहत नाही. सौंदर्य, स्वभाव, संसार, त्याग, सहनशीलता, मुलांचं संगोपन — प्रत्येक गोष्टीत स्त्रीला दुसऱ्या स्त्रीशी तोललं जातं. परिणामी दुसऱ्या स्त्रीकडे प्रेरणा म्हणून पाहण्याऐवजी तिला स्पर्धक म्हणून पाहण्याची सवय लागते.
स्त्रीला “तू योग्य आहेस” हे फार कमी वेळा सांगितलं जातं. “तुला स्वतःला सिद्ध करावंच लागेल” याची मात्र सतत जाणीव करून दिली जाते. त्यामुळे सतत स्वतःला सिद्ध करण्याच्या या धावपळीत दुसऱ्या स्त्रीच्या भावनांकडे सहानुभूतीने पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होत नाही.
प्रत्येक स्त्रीच्या मनात एक न बोललेला संघर्ष असतो
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात काही न बोललेल्या वेदना असतात. काहींची स्वप्नं परिस्थितीने अर्धवट सोडली असतात. काहींना आयुष्यभर स्वतःला सिद्ध करत राहण्याचा थकवा असतो. काहींना प्रेम, आदर न मिळाल्याची सल असते.
बाहेरून सगळं व्यवस्थित दिसणाऱ्या अनेक स्त्रिया आतून खूप थकलेल्या असतात.
त्या जगासमोर हसतात, जबाबदाऱ्या निभावतात, इतरांची काळजी घेतात; पण त्यांच्या स्वतःच्या मनात किती गोंधळ आहे, हे फार कमी लोकांना दिसतं.
अशा वेळी दुसऱ्या स्त्रीचा आत्मविश्वास, यश किंवा स्वातंत्र्य स्वतःच्या एखादीला आपल्या उणिवांची
आठवण करून देतं, आणि तिथून नकळत तुलना सुरू होते.
अनेक स्त्रिया कठोर नसतात, त्यांना दीर्घकाळ कोणी समजून घेतलेलं नसतं. भावनिक आधार मिळालेला नसतो.
त्यामुळे त्या आतून कोरड्या होत जातात.
समाज मात्र स्त्रीकडून खूप अपेक्षा ठेवतो, समजूतदारपणा, त्याग, संयम, सहनशीलता, प्रेम हे सगळं तिने इतरांना द्यायला हवं अशी अपेक्षा नाही तर बंधन असतं. तिच्या भावनिक गरजांकडे मात्र फार कमी वेळा लक्ष दिलं जातं.
आई, पत्नी, मुलगी, सून, सह कर्मचारी अशा अनेक भूमिका निभावताना ती सतत दुसऱ्यांसाठी उपलब्ध असते. पण तिच्यासाठी कोण उपलब्ध असतं? तिच्या थकव्याला, असुरक्षिततेला किंवा मनातल्या गोंधळाला किती वेळा खरंच समजून घेतलं जातं?
' मी आहे सोबत ' तिच्या साठी बोलला गेलेला असा आश्वासक शब्द अस्तित्वात नाही.
स्त्रीला अनेकदा सल्ले मिळतात, पण समजून घेणारे लोक कमी मिळतात.
भावनिक उपेक्षा माणसाला आतून कठोर बनवते. जेव्हा स्वतःच्या भावनांनाच जागा मिळत नाही, तेव्हा दुसऱ्यांच्या भावनांना समजून घेण्याची ताकद हळूहळू कमी होऊ लागते.
स्त्रियांच्या नात्यांभोवती तयार केलेल्या प्रतिमा
समाजाने स्त्रियांच्या नात्यांभोवती अनेक ठरावीक प्रतिमा तयार केल्या आहेत. “सासू–सून कधी जुळत नाहीत”, “दोन स्त्रिया एकत्र राहू शकत नाहीत”, “स्त्रियांमध्ये मत्सर असतो” — अशा वाक्यांची इतकी पुनरावृत्ती केली जाते, की तीच वास्तव वाटू लागतात.
या पूर्वग्रहांचा परिणाम असा होतो की, स्त्रिया एकमेकींकडे आधीपासूनच सावध नजरेने पाहू लागतात. नातं तयार होण्याआधीच मनात भिंती उभ्या राहतात. मग छोट्या गैरसमजांनाही संघर्षाचं रूप येतं.
विशेष म्हणजे पुरुषांच्या मतभेदांना “स्वभावातील फरक” म्हणून सहज स्वीकारलं जातं; पण स्त्रियांच्या मतभेदांना लगेच भावनिक आणि वैयक्तिक रंग दिला जातो.
कधी कधी दोन स्त्रियांमधील शांत अंतरही समाजाला “भांडण” वाटतं.
पूर्वीच्या काळी तुलना मर्यादित होती. आता सोशल मीडियामुळे ती सतत आणि सर्वव्यापी झाली आहे. प्रत्येकजण आपलं आयुष्य सुंदर, परिपूर्ण आणि आनंदी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे पाहताना अनेक स्त्रिया नकळत स्वतःच्या आयुष्याशी तुलना करू लागतात.
दुसऱ्या स्त्रीचं हसणं, सौंदर्य, करिअर, नातं किंवा आत्मविश्वास पाहताना स्वतःच्या आयुष्यातील रिकाम्या जागा अधिक ठळकपणे जाणवू लागतात.
सोशल मीडिया आपल्याला लोकांचं आयुष्य दाखवतो; त्यांचा संघर्ष दिसून येत नाही.
म्हणूनच तुलना वाढते, आणि समज कमी होत जाते. इतर स्त्रियांची तुलना टाळून
स्वविकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वैचारिक प्रगल्भता असणं आवश्यक आहे.
किंवा एखाद्या स्त्रीकडे असलेले विशेष गुण आत्मसात करून सामुहिक विकास साधला जाऊ शकतो.
विचारांची , गुणांची देवाण घेवाण करण्यासाठी स्त्रीयांनी एकमेकीबद्दलची असुया
आपण अनेकदा “समजून घेणं” आणि “सहमत असणं” यात गोंधळ करतो. दुसऱ्या स्त्रीचं दुःख किंवा वागणं समजून घेण्यासाठी तिच्याशी पूर्ण सहमत असणं आवश्यक नसतं. फक्त तिच्या अनुभवांकडे प्रामाणिकपणे पाहण्याची तयारी आवश्यक असते.
प्रत्येक व्यक्ती तिच्या अनुभवांमधून घडलेली असते. ज्या स्त्रीने आयुष्यभर अपमान सहन केला, तिचा स्वभाव कठोर होऊ शकतो. जिच्यावर सतत नियंत्रण ठेवलं गेलं, ती पुढे जाऊन दुसऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू शकते.
हे योग्य नाही. पण त्यामागचं कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे.
कारण समज हीच बदलाची पहिली पायरी असते.
स्त्रिया एकमेकींना खरंच समजून घ्यायचा प्रयत्न करतात का?
हा प्रश्न थोडा कठोर आहे, पण आवश्यक आहे. अनेकदा आपण दुसऱ्या स्त्रीचं पूर्ण बोलणं ऐकण्याआधीच तिच्याबद्दल मत तयार करून टाकतो.
तिच्या निर्णयांमागची परिस्थिती, तिची भीती, तिची वेदना किंवा तिच्या आयुष्यातील संघर्ष समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही.
एखादी स्त्री शांत असेल, तर तिला अहंकारी समजलं जातं. खूप बोलली, तर तिला हलकं उथळ जातं. स्वतःसाठी उभी राहिली, तर तिला स्वार्थी म्हटलं जातं. सहन करत राहिली, तर तिला कमकुवत समजलं जातं.
स्त्री अनेकदा दुसऱ्या स्त्रीला तिच्या वागण्यावरून ओळखते; पण तिच्या जखमांकडे पाहायला विसरते.
मग बदलाची सुरुवात कुठून होईल?
बदलाची सुरुवात तुलना थांबवण्यापासून होईल. प्रत्येक स्त्रीचं आयुष्य वेगळं आहे, तिचे संघर्ष वेगळे आहेत आणि तिची क्षमता वेगळी आहे. दोन स्त्रियांना एकाच मापाने मोजणं थांबलं, की स्पर्धेचं ओझं हलकं होईल.
दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे संवाद. अनेक नाती गैरसमजांमुळे तुटतात. जे बोललं जात नाही, तेच मनात साचत राहतं आणि हळूहळू कटुता बनतं.
एकमेकींचं कौतुक करण्याची सवयही आवश्यक आहे. दुसऱ्या स्त्रीच्या यशामुळे स्वतःची किंमत कमी होत नाही, हे स्वीकारणं महत्त्वाचं आहे.
कदाचित स्त्रियांना एकमेकींची गरज स्पर्धक म्हणून नाही, तर साक्षीदार म्हणून जास्त आहे — अशा साक्षीदारांची, ज्यांना त्यांच्या न बोललेल्या संघर्षांची जाणीव असेल.
स्त्रिया एकमेकींना समजून घेण्यात अपयशी ठरतात, कारण समजून घेण्यापेक्षा तुलना, स्पर्धा या गोष्टी त्यांच्यात अधिक रूजवल्या गेल्या.
जाणीवपूर्वक एकमेकींच्या स्पर्धक म्हणून उभे केले गेले आहे. त्यांच्यातील संघर्षामागे वैयक्तिक दोषांपेक्षा सामाजिक रचना, भावनिक उपेक्षा आणि असुरक्षितता अधिक जबाबदार आहेत.
मात्र ही परिस्थिती बदलू शकते.
जेव्हा स्त्री दुसऱ्या स्त्रीकडे स्पर्धक म्हणून नव्हे, तर एक थकलेला, संघर्ष करणारा माणूस म्हणून पाहू लागेल, तेव्हा समज निर्माण होईल.
कारण प्रत्येक स्त्रीच्या आत एक अशी जागा असते, तिथे फक्त थोडंसं समजून घेतलं जावं, एवढंच वाटत असतं.
- छाया
हेही वाचा -
महत्त्वाची निरिक्षणे व मांडणी
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवा