समाजातील व्यसनाधीनता व त्यात होरपळणारे स्त्री जीवन

समाजातील  व्यसनाधीनता व त्यात होरपळणारे स्त्री जीवन


      नुकत्याच जाहीर झालेल्या इंजिनिअरिंगच्या देश पातळीवर परिक्षेच्या निकालात एक मुलगा देशात सातवा आला. 
आता अनेक मुलं येत असतात यात काय नवल असं वाटू शकतं. याचं वेगळेपण असं की, या मुलाच्या घरची परिस्थिती अतिशय हालाखीची. 
हातावरचं पोट.
त्यातच वडिलांना दारूचं भयंकर व्यसन. 
या मुलाची आई मोलमजुरी करून दोन मुलं, नवरा,सासू सासरे एवढ्यांचं पोट भरत होती. घरात सतत भांडणं. अशा परिस्थितीत ही मुलं शिकतील असा विचारही मनात  येणं शक्य नाही. 
   चार वर्षांपूर्वी या मुलाचे वडील एक दिवस दारू पिऊन मरून पडले. तेव्हापासून हे कुटुंब कसं आहे याची माहिती नव्हती. मात्र अचानक 
आज या मुलाने देशात रॅंक काढला. आणि आश्चर्याचा धक्का बसला.

     वडील असते तर तो हे यश कदाचित मिळवू शकला नसता असा विचार मनात येऊन गेला
  ( खरं तर असा विचार मनात यायला नको होता) 
 कारण व्यसनाधीन झालेली माणसं त्यांच्या सहवासातील लोकांना विकासासाठी संधीच देत नाहीत. तेवढा वेळ मिळू देत नाहीत. ते देतात ते केवळ ताण, नैराश्य, हतबलता. 
त्यांच्या सोबत राहत असताना सगळ्या कुटुंबाला मानसिक ताणातून जावं लागतं. त्यात लहान मुलांचं जास्तच नुकसान होतं. 
व्यसनाधीन माणसं स्वतःच आपल्या कुटुंबाच्या पतनाला कारणीभूत ठरतात. ही किती वाईट गोष्ट आहे. 

        आजचा मानवी समाज विज्ञान, तंत्रज्ञान, आधुनिक जीवनशैली व प्रगतीच्या  शिखरावर उभा आहे. प्रत्येक क्षेत्रातील विकासाने महत्वाचा टप्पा पार केला आहे.
मात्र या चमकदार वास्तवामागे एक दाट काळोखही वरचेवर वाढताना दिसतो आहे.
तो म्हणजे समाजात झपाट्याने वाढणारी  व्यसनाधीनता. 
दारू, तंबाखू, गुटखा, अमली पदार्थ,याचे व्यसन ,व  इतर अनेक प्रकारच्या व्यसनांनी आज असंख्य कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत. झाले आहेत. 
    सुरुवातीला “फक्त मजा” म्हणून सुरू झालेले व्यसन हळूहळू माणसाच्या आयुष्यावर पुर्णपणे ताबा मिळवते. 
मात्र या व्यसनांच्या आगीत जळणारी व्यक्ती फक्त व्यसन करणारी व्यक्तीच नसते, तर त्याच्यासोबत त्याचे संपूर्ण कुटुंब होरपळत असते. विशेषतः स्त्री.
 पत्नी, आई,  यापैकी कोणी का असेना सर्वाधिक मानसिक, आर्थिक, सामाजिक सगळ्याच स्तरावरील त्रास या स्त्रीला सहन करावा लागतो. तिच्याकडे व्यक्ती म्हणून न पाहता ती दारूड्याची पत्नी,आई, असं बघितलं जातं. त्या व्यसनी व्यक्तीच्या कुटूंबाला, मुलांना दारूड्याचं कुटुंब म्हणून बघितलं जातं. त्यांची समाजात कवडीचीही  किंमत राहत नाही. कारण दारूडा हा त्या परिवारचा प्रमुख असतो. प्रमुख व्यक्तीच्या मानमरातबावरून त्या परिवाराला मानमरातब मिळत असतो. दारुड्याने सगळं गमावलेलं असतं परिणामी कुटूंबालाही ते मिळत नाही. 
हे झालं सामाजात मिळणारी वागणूक.

     दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्या परिवाराला प्रचंड आर्थिक अडचणीतून जावं लागतं. तो व्यक्ती जर एकटाच कमावणारा असेल तर तो आपल्या व्यसनाला कमी पडणार नाही हेच तो बघत असतो. घराच्या गरजांची पूर्तता करणे हे त्याच्या लेखी महत्त्वाचं असत नाही. त्यामुळे मुलांना शिक्षणासाठी अनेक अडचणी येतात. बायको व आईवडील असतील तर त्यांचं रोजचं जगणं अवघड होऊन बसतं.
आर्थिक संकटाची सर्वात मोठी झळ मुलांच्या शिक्षणाला बसते . 
 व्यसनाधीनतेमुळे घरातील आर्थिक संतुलन पूर्णपणे बिघडते. कमाईचा मोठा भाग दारू, गुटखा किंवा इतर नशांमध्ये खर्च होतो. परिणामी घर चालवण्याची जबाबदारी स्त्रीवर येते.
अनेक स्त्रिया शिवणकाम, घरकाम, शेतमजुरी किंवा छोट्या नोकऱ्या करून संसार सांभाळतात. काही वेळा मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरखर्चासाठी त्यांना दागिने विकावे लागतात. स्वतःच्या इच्छा, स्वप्नं आणि आरोग्य बाजूला ठेवून ती स्त्री मुलं कुटुंब यासाठी जगत राहते.

        आज समाजात दारूचे व्यसन एवढे वाढले आहे की प्रत्येक घरात एक तरी व्यसनी माणूस आढळून येतो, तर तीन चार दुकानापैकी एक  दुकान दारूचे आहे. ज्या गोष्टीची उपलब्धता जास्त त्याचा वापरही तेवढाच जास्त होतो. व्यसनी लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
  मात्र व्यसनाचा कुटुंबावर खूप वाईट परिणाम होतो. अनेक परिवार देशोधडीला लागले आहेत.
अशा परिवाराला मानसिक आर्थिक स्थैर्य लाभत नाही. कुटुंबला सतत अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं.
   दारूमुळे होणारी घरगुती हिंसा, त्यामुळे मुलाबाळांचं बिघडलेलं मानसिक आरोग्य  दारूच्या व्यसनामुळे त्रस्त स्त्रिया हे विषय आजच्या समाजासमोरील सर्वात ज्वलंत प्रश्न आहेत. 
मात्र याकडे जेवढं गांभीर्याने बघितलं जाणं आवश्यक आहे तेवढं ते बघितलं जात नाही.
या बाबतीत समाज खूप उदासीन आहे. किंवा मुद्दाम याकडे दुर्लक्ष केले जाते. कारण सर्वात जास्त कर देणारा हा व्यवसाय बंद करणे सरकारला परवडणारे नाही. 
भलेही त्यात अनेक कर्त्या पुरुषांचे बळी गेले तरी चालतील. अनेक कोवळ्या जीवांचे भविष्य अंधकारमय झाले तरी चालेल. समाज पोखरून निघाला तरी हरकत नाही. 
असंच काहीसं धोरण दिसून येतं.
व्यसन हे आता फक्त वैयक्तिक समस्या राहिलेली नाही; ते सामाजिक संकट बनले आहे.
यावर उपाय झाला नाही तर ते भयावह रूप धारण करू शकते. 

वाढती व्यसनाधीनता व कारणं 

     आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस मानसिकदृष्ट्या अधिक अस्थिर होत चालला आहे. बेरोजगारी, आर्थिक ताण, अपयश, कौटुंबिक तणाव, स्पर्धा, नैराश्य आणि एकटेपणा यामुळे अनेक लोक मानसिक आधार शोधू लागतात. काहींना त्यातून मार्ग सापडतो तर काही जण सोपा उपाय म्हणून नशेकडे वळतात.

दारू किंवा सिगारेट घेतल्याने “ताण कमी होतो”, “मन हलकं होतं” अशी चुकीची माहिती पसरवली जाते. याचा आधार घेऊन तरूण या जाळ्यात अडकतात. 
सामाजमाध्यमं, मालिका आणि चित्रपटांमध्ये व्यसनांना अनेकदा आधुनिक जीवनशैलीचे प्रतीक म्हणून दाखवले जाते. त्यामुळे तरुणांमध्ये व्यसनांविषयी आकर्षण निर्माण होते. मित्रांच्या दबावाखाली किंवा “आधुनिक” दिसण्याच्या नादात अनेक शहरी तरुण व्यसनांच्या आहारी जातात.

    ग्रामीण भागातही परिस्थिती फार वेगळी नाही. गावोगावी सहज उपलब्ध होणारी दारू, गुटखा आणि तंबाखूची विक्री यामुळे अल्पवयीन मुलांपर्यंतही व्यसन पोहोचले आहे. अनेक घरांमध्ये संवादाचा अभाव, पालकांचे दुर्लक्ष आणि भावनिक आधाराची कमतरता यामुळे मुलं चुकीच्या मार्गाला लागतात. मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता नसल्याने अनेक जण समस्यांवर उपचार घेण्याऐवजी व्यसनात स्वतःला झोकून देतात.

     
     एखादी व्यक्ती व्यसनाधीन झाली की तिच्यासोबत संपूर्ण कुटुंब अधोगतीला जाते.  घरातील वातावरण तणावपूर्ण बनते.  घारात सतत आरडाओरड, भांडणं, शिवीगाळ आणि हिंसा सुरू होते. व्यसनी व्यक्ती हळूहळू कुटुंबापासून भावनिकदृष्ट्या दूर जातो. कुटुबही त्याच्यापासून दुरावते. 
    व्यसनाचा सर्वात मोठा परिणाम आर्थिक स्थितीवर होतो. घरासाठी कमावलेला पैसा नशेत खर्च होऊ लागतो. मुलांचे शिक्षण, घरखर्च, औषधोपचार, अन्न, कपडे यांसारख्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होते. काही कुटुंबं कर्जबाजारी होतात, तर काहींची घरे, असलेले जे काही आहे ते सर्व विकले जाते. अनेक स्त्रियांना घर चालवण्यासाठी स्वतः मजुरी करावी लागते.   घरातील शांती समाधान हरवून जाते.
 व्यसनाधीन व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा आणि आक्रमक होत जातो. त्यामुळे घरातील सदस्य सतत भीतीच्या वातावरणात जगतात. घर हे सुरक्षिततेचे ठिकाण न राहता मानसिक छळाचे केंद्र बनते.

     व्यसनाच्या या सगळ्या परिस्थितीत सर्वाधिक  सहन करणारी स्त्री असते. भारतीय समाजात, संसार टिकविणे ही जबाबदारी बाईची आहे असा सामाजिक दबाव असल्याने. 
त्यामुळे नवरा व्यसनी असला, हिंसक असला किंवा जबाबदारी टाळत असला तरी संसार वाचवण्याची जबाबदारी स्त्रीवरच येते.
मानसिक छळ आणि भावनिक तुटणं
व्यसनी नवऱ्यासोबत राहणारी स्त्री सतत भीतीच्या छायेत जगते. सततची मारहाण,  मुलांसमोर होणारा अपमान ,घरखर्चाची विवंचना अशा असंख्य गोष्टींनी तिचं मन थकून जातं.
अनेक व्यसनी पुरुष पत्नीवर संशय घेतात, तिला कमी लेखतात, शिवीगाळ करतात. दुर्लक्ष उपेक्षा यामुळे स्त्रीचा आत्मविश्वास कमी होतो.
     ती मानसिकदृष्ट्या खचत जाते. काही स्त्रिया नैराश्य, चिंता आणि मानसिक तणावाने ग्रस्त होतात; पण समाजाच्या भीतीने त्या मदत मागू शकत नाहीत.
अशा नात्यात होणारा भावनिक छळ, मानसिक आघात सहन करावा लागतो . 
व्यसनाधीन जोडीदारामुळे गृहिणींमध्ये वाढणारे नैराश्य ही चिंतेची बाब आहे.
  हे अनेक स्त्रियांच्या आयुष्याशी जोडलेले आहे.

   घरगुती हिंसेच्या घटनांमध्ये व्यसनाधीनतेचा मोठा संबंध असतो. स्त्रिया अनेकदा केवळ मुलांच्या भविष्यासाठी हे अत्याचार सहन करत राहतात. समाज मात्र याकडे “घरगुती गोष्ट” म्हणून पाहतो.
भारतीय समाजातील हीच सर्वात वेदनादायक बाब आहे की, स्त्रीच्या आयुष्यातील गंभीर समस्येकडे, तिच्या वेदनांकडे संवेदनशीलतेने पाहिले जात नाही. 
जूला ठेवून त्या कुटुंबासाठी जगत राहतात.

     व्यसनाधीनेची सर्वात मोठं नुकसान करणारी बाजू म्हणजे, त्या वातावरणात वाढणाऱ्या मुलांचं बालपण हरवून जातं. घरातील सततचे भांडण, भीती आणि हिंसा यामुळे मुलं मानसिकदृष्ट्या असुरक्षित बनतात. काही मुलं अबोल होतात, तर काही चिडचिडी आणि आक्रमक बनतात.
अशा वातावरणात वाढलेल्या मुलांच्या अभ्यासावरही परिणाम होतो. त्यांच्यात आत्मविश्वास कमी होतो. काही मुलं पुढे जाऊन स्वतःही व्यसनांकडे वळतात. त्यामुळे व्यसनाचा परिणाम फक्त एका पिढीपुरता मर्यादित राहत नाही, तर तो पुढच्या पिढीलाही प्रभावित करतो.
मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बालपणी अनुभवलेली हिंसा आणि असुरक्षितता व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करू शकते. म्हणूनच व्यसन हा केवळ वैयक्तिक प्रश्न नसून सामाजिक आरोग्याचा विषय आहे. इथे स्त्रीला अनेक भुमिका पार पाडाव्या लागतात. ती मुलांचं दुहेरी पालक होते. त्या व्यक्तीच्या सर्व जबाबदाऱ्या तिला सांभाळाव्या लागतात. 

    या सगळ्या ओढाताण सहन करूनही अनेक स्त्रिया खंबीरपणे संसारासाठी उभ्या राहतात. स्वतः दुःखात असतानाही मुलांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. नवरा सुधरेल या आशेवर त्या वर्षानुवर्षे संघर्ष करत राहतात.
काही स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनून परिस्थितीशी लढतात. काही सामाजिक संस्थांच्या मदतीने स्वतःचे आयुष्य नव्याने उभे करतात. त्यांच्या संघर्षात वेदना असतात; पण त्यात अपार धैर्यही असतं. त्या आपल्या कुटुंबासाठी  खंबीरपणे उभ्या राहतात .
भारतीय स्त्रीची हीच खरी ताकद आहे. 
 
 या विषयाकडे बघताना समाजाची भूमिका बदलण्याची गरज आहे.

समाजाने संवेदनशील होण्याची गरज आहे. 
आपल्या समाजात पुरुषांच्या व्यसनांकडे अनेकदा “सामान्य गोष्ट” म्हणून पाहिले जाते. “पुरुष आहेत, थोडी दारू पितात” असे म्हणत अनेक लोक परिस्थितीकडे दुर्लक्ष करतात. पण त्या मागे एका स्त्रीचे उद्ध्वस्त होत जाणारे आयुष्य कोणी पाहत नाही.
घरगुती हिंसा, मानसिक छळ आणि आर्थिक अत्याचार याकडे “सहन कर” असे सांगून दुर्लक्ष केले जाते. ही मानसिकता बदलणे अत्यंत आवश्यक आहे.
समाजाने टीका करण्याऐवजी आधार देण्याची गरज आहे. व्यसनाधीन व्यक्तींना उपचार आणि समुपदेशन मिळाले पाहिजे. त्याचबरोबर स्त्रियांना कायदेशीर, मानसिक आणि आर्थिक मदतही उपलब्ध झाली पाहिजे.

    व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी केवळ सरकार नव्हे तर प्रत्येक कुटुंब आणि समाजाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
कौटुंबिक स्तरावर अनेक गोष्टी करणे आवश्यक आहे. 
मुलांशी मोकळा संवाद वाढवणे
मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे
घरात विश्वास आणि प्रेमाचे वातावरण ठेवणे
सामाजिक स्तरावर व्यसनमुक्ती अभियान राबवणे
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती करणे
महिलांसाठी सहाय्य केंद्रे आणि मदत दूरध्वनी सेवा सुरू करणे
शासनाची भूमिका येथे महत्वाची आहे. 
अवैध दारू आणि अमली पदार्थांवर कठोर कारवाई
पुनर्वसन केंद्रांची संख्या वाढवणे
मानसिक आरोग्य सेवा अधिक उपलब्ध करणे
स्त्रियांसाठी आर्थिक स्वावलंबनाचे उपक्रम राबविणे. 
कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे. 
समुपदेशन आणि मानसिक आधार मिळेल अशी व्यवस्था निर्माण करणे.
स्वसंरक्षण आणि आत्मविश्वास प्रशिक्षण केंद्र उभी करणे.


     नशेची व्यसनाधीनता हे केवळ एका व्यक्तीचे नुकसान करत नाही, तर व्यसन हे संपूर्ण कुटुंबाला आतून पोखरून टाकते.
या आगीत सर्वाधिक होरपळ सहन करणारी स्त्री असते. तिची स्वप्नं, तिचं मानसिक स्वास्थ्य, तिचा आत्मसन्मान आणि तिचं आयुष्य या सगळ्यावर व्यसनाचे सावट पडते.
तरीही ती मुलांसाठी, संसारासाठी आणि नात्यांसाठी झगडत राहते. म्हणूनच समाजाने स्त्रीच्या वेदना समजून घेणे आवश्यक आहे. व्यसनांकडे केवळ “सवय” म्हणून नव्हे, तर सामाजिक आणि मानसिक आरोग्याच्या गंभीर प्रश्नाप्रमाणे पाहिले पाहिजे.
प्रत्येक घर व्यसनमुक्त झालं तरच स्त्रीचं आयुष्य सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि आनंदी होईल. कारण एक स्त्री वाचली तर एक कुटुंब वाचतं, आणि एक कुटुंब वाचलं तर समाज अधिक संवेदनशील, मजबूत आणि निरोगी बनतो.

- छाया

हेही वाचा -

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .