वारी : भक्ती, समता मानवतेची शाळा | मराठी लेख
वारी : भक्ती, समता मानवतेची शाळा
"जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया..."
वारकरी संप्रदायातील हा भावस्पर्शी स्वर केवळ अभंगातील शब्द नाही; तो लाखो वारकऱ्यांच्या अंतःकरणातील ओढ आहे. आपल्या विठू माउलीच्या दर्शनासाठी अनवाणी पायांनी चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर ते त्याचे माहेर आहे. म्हणूनच दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक टाळ-मृदंगाच्या निनादात, अभंगांच्या गजरात आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या अखंड जयघोषात पंढरीची वाट धरतात. संसाराचा गाडा ओढून दमलेल्या जीवावरचं सगळं ओझं उतरवून ठेवून मुक्तीची पताका खांद्यावर घेऊन पंढरिच्या वाटेवरून पावलं धावत सुटतात.
त्याच बरोबर सामाजिक दृष्टीने विचार केला तर, पंढरीची वारी ही केवळ धार्मिक यात्रा, किंवा उत्सव नाही; तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाचा आत्मा आहे.
शेकडो वर्ष सुरू असलेल्या वारीत संतांच्या विचारांचा अमूल्य वारसा, समतेची शिकवण, शिस्तीचे विलक्षण दर्शन आणि माणुसकीची उब या सर्वांचा अद्भुत संगम दिसून येतो.
सातशे ते आठशे वर्षात काळ बदलला, राजवटी बदलल्या, समाजरचना बदलली; पण विठ्ठलभक्तीची ही अखंड ज्योत आजही प्रज्वलित आहे.
वारीची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात झाली, अशी सर्वसामान्य समजूत असली तरी वारीला त्याही आधीपासून सुरू झाली होती.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे स्वतः नियमित पंढरपूरची वारी करणारे वारकरी होते.
यावरून ही परंपरा संत ज्ञानेश्वरांच्या जन्मापूर्वीपासूनच अस्तित्वात होती, हे स्पष्ट होते. पुढे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सावता माळी, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत सेना महाराज अशा अनेक संतांनी आपल्या जीवनातून आणि अभंगातून या परंपरेला जनमानसात रुजवले. त्यांनी भक्तीला मंदिरांच्या चौकटीत न ठेवता ती थेट माणसांच्या जीवनात आणली.
वारीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे संत भानुदास महाराजांचे कार्य. इ.स. १५०८ ते १५११ या काळात विजयनगरच्या राजाने विठ्ठलाची मूर्ती हंपी (अनागोंदी) येथे नेल्याची ऐतिहासिक नोंद आढळते. त्या वेळी संत भानुदास महाराजांनी अपार श्रद्धा आणि धैर्याच्या बळावर ती मूर्ती पुन्हा पंढरपूरात आणली. त्यामुळे विठ्ठलभक्तांना पुन्हा आपल्या आराध्य देवाचे दर्शन घेता आले आणि वारीची परंपरा पूर्ववत सुरू राहिली.
संत भानुदास हे संत एकनाथ महाराजांचे पणजोबा होत. त्यांच्या या कार्यामुळे वारकरी परंपरेला नवसंजीवनी मिळाली.
यानंतर वारीला अधिक संघटित स्वरूप मिळाले. इ.स. १६८५ मध्ये संत तुकाराम महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव नारायण महाराज यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचा पालखी सोहळा सुरू केला. सुरुवातीला दोन्ही संतांच्या पादुका एकाच पालखीतून पंढरपूरकडे जात असत. तेव्हा पासून "ज्ञानोबा-तुकाराम" हा गजर संपूर्ण महाराष्ट्रात निनादत आहे
पुढे इ.स. १८३२ मध्ये आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि देहूहून संत तुकाराम महाराजांची अशा दोन स्वतंत्र पालख्या आणि त्यांचे स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आले. आजही या दोन्ही पालख्या लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने, शिस्तबद्ध दिंड्यांसह आणि विठ्ठलनामाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात.
वारीची ताकद तिच्या प्राचीनतेत नाही; तर प्रत्येक पिढीने तिला तेवढ्याच श्रद्धेने जपण्यात आहे. म्हणूनच शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा आजही महाराष्ट्राच्या जनजीवनात वारी हा जगण्याचा भाग झालेली आहे, एवढी ती एकरूप झालेली दिसून येते.
रिंगण, पालखी आणि वारकरी संप्रदायाचे जीवनतत्त्व
"सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,
कर कटावरी ठेवूनिया..."
या अभंगातील विठ्ठलाचे रूप वारकऱ्यांच्या हृदयात सदैव विराजमान असते, व पंढरीच्या वारीतील प्रत्येक पाऊल विठ्ठलनामाने भारलेले असते. वारी ही केवळ एक मोठा समुदाय एकत्रितपणे पायी चालण्याची परंपरा नाही, तर वारी ही भक्ती, शिस्त, समर्पण आणि सामूहिक जीवनाचे सामंजस्य शिकविणारे विद्यापीठ आहे.
माझ्या सासुबाई त्यांच्या काळातील वारीच्या रम्या आठवणी सांगायच्या-
" माय, वारीत दिवस कसे गेले ते कळत नायी, दिवसभर विठूरायाचं नाव घेत चालत रहायचं. रातीला मुकाम पडला तिथं आपली पासोडी सोडून स्वैपाक करून जेवण करायचं. मग भजन, कीर्तन, पाऊल, फुगड्या खेळायच्या. पहाट झाली की आवरा आवर करुन पंढरीच्या वाटला लागायचं. आषाढीच्या दिवशी पंढरपुरात चंद्रभागामायीत आंघूळ अन् मग इठू माऊलीचं दर्शनानं सगळा शीण भाग हारून जाते."
सासूबाईंच्या आठवणी ऐकताना आपणही वारीत चालत आहोत असं वाटायचं.
वारीतील सर्वांत आकर्षक आणि भावस्पर्शी सोहळ्यांपैकी एक म्हणजे रिंगण सोहळा असतो असं त्या म्हणायच्या.
पालखी मार्गावरील निवडक ठिकाणी हा सोहळा पार पडतो. 'रिंगण' म्हणजे पालखीभोवती वारकऱ्यांनी तयार केलेले वर्तुळ. या या गोलाकार रिंगणात माऊलींचा घोडा पळत असतो.
वारकऱ्यांची अशी मान्यता आहे की, हा घोडा केवळ घोडा नसून माऊलींच्या चैतन्याचे प्रतीक आहे.
घोड्याच्या टापांनी उडालेली धूळही प्रसाद मानून वारकरी ती भक्तिभावाने मस्तकी लावतात.
त्या क्षणी हजारो डोळ्यांतून आनंदाश्रू वाहतात, टाळ-मृदंगांचा निनाद आसमंत भरून टाकतो व संपूर्ण वातावरण विठ्ठलनामाने दुमदुमून जाते.
रिंगणाचे दोन प्रमुख प्रकार आहेत—गोल रिंगण आणि उभे रिंगण. गोल रिंगणात सर्व दिंड्या वर्तुळाकार उभ्या राहतात, तर उभ्या रिंगणात दिंड्या पालखीच्या दोन्ही बाजूंना समोरासमोर उभ्या असतात. या दोन्ही प्रकारांत अश्वाची दौड हा भक्तीचा सुंदर सोहळा असतो . आनंदाचा परमोच्च क्षण असतो.
चांडोबाचा लिंब, फलटण, इंदापूर, वाखरी यांसारख्या ठिकाणी होणारे रिंगण सोहळे आजही लाखो भाविकांना भक्तिरसाने न्हाऊ घालतात.
वारकरी संप्रदायाचा खरा अर्थ त्याच्या मानवातावादी तत्त्वज्ञानात आहे.
येथे विठ्ठलभक्ती ही केवळ पूजा-अर्चा , आडंबर नाही किंवा नुसते कर्मकांड नाही. ती प्रत्येक माणसावर प्रेम करण्याची, प्रत्येक जीवात विठ्ठल पाहण्याची आणि प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्याची शिकवण देते.
भागवत धर्माच्या या परंपरेत विठ्ठलाचे नामस्मरण हेच सर्वांत मोठे साधन मानले जाते. म्हणूनच वारकरी प्रत्येक श्वासागणिक "ज्ञानोबा-तुकाराम" , "विठ्ठल विठ्ठल" असा अखंड नामजप करीत चालत असतात.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अध्यात्माचे ज्ञान सर्वसामान्यांच्या भाषेत आणले. तर जगतगुरु संत तुकोबारायांनी अभंगांतून समाजातील दंभ, अंधश्रद्धा आणि अन्यायावर कठोर प्रहार केला. संत नामदेवांनी भक्तीला प्रेमाची दिशा दिली, तर संत चोखामेळा, सावता माळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सेना महाराज, जनाबाई यांसारख्या संतांनी आपल्या आचरणातून सिद्ध केले की विठ्ठलाच्या दरबारात जात-पात, उच्च-नीच किंवा श्रीमंत-गरीब असा कोणताही भेद नाही. सर्वांना विठ्ठलभक्ती करण्याचा अधिकार आहे.
ऊंस डोंगा परी रस नव्हे डोंगा ।काय भुललासी वरलिया रंगा ॥१॥कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा ।काय भुललासी वरलिया रंगा ॥२॥नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें ।काय भुललासी वरलिया रंगा ॥३॥चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा ।काय भुललासी वरलिया रंगा ॥४॥
ऊस बाहेरून वाकडा असला तरी त्याचा रस गोडच असतो, त्याप्रमाणे बाह्य रूपावर न जाता माणसाच्या मूळ स्वभावाला, आंतरिक निर्मलतेला मनाच्या, आचरणाच्या शुद्दतेला
व भक्तीला महत्त्व द्यावे असं सांगून,
चोखोबा म्हणतात, माणूस त्याच्या बाह्य रूपावरून किंवा जाती वरून श्रेष्ठ कनिष्ठ ठरत नाही तर तर तो त्याच्या गुणांनी कर्मांनीं श्रेष्ठ ठरतो . अशा प्रकारे मानवतावादी विचार संतांनी लोकांमध्ये रूजविण्याचं काम केलं. हे वारकरी संप्रदायाची विशेष बाब आहे.
"जे का रंजले गांजले,
त्यासी म्हणे जो आपुले."
संत तुकाराम महाराजांचा हा अभंग वारकरी संप्रदायाच्या मानवतावादी विचारांचा पाया आहे. दुःखी, वंचित, उपेक्षित आणि गरजू माणसाची सेवा हीच खरी विठ्ठलभक्ती, असा संदेश या परंपरेने दिला. म्हणूनच वारीत प्रत्येक जण दुसऱ्याला "माऊली" म्हणून संबोधतो. या एका शब्दात प्रेम, आदर, समता आणि आपलेपणाची जाणीव व वारकरी संप्रदायाची शिकवण सामावलेली आहे.
वारीतील दिंडी व्यवस्था ही जगासाठी आदर्श ठरावी अशी समाजसंघटनाची पद्धत आहे. आज लाखो वारकरी पंढरपूरकडे निघतात; तरीही त्यांच्यात गोंधळ, धक्काबुक्की किंवा अव्यवस्था क्वचितच दिसते. प्रत्येक दिंडीचे स्थान, मुक्काम, वेळ आणि जबाबदाऱ्या निश्चित असतात. दिंडीप्रमुख, चोपदार आणि सेवेकरी यांच्या समन्वयामुळे एवढा मोठा जनसमुदायही शिस्तीत प्रवास करतो.
दिंडीत चालताना कोणी स्वतःसाठी जगत नाही; सर्वजण एकमेकांसाठी जगतात. कुणी पाणी पाजतो, कुणी अन्नदान करतो, कुणी थकलेल्या वारकऱ्यांचे पाय चोळतो, तर कुणी वैद्यकीय सेवा देतो. ही सेवा प्रसिद्धीसाठी नसते; ती विठ्ठलाला अर्पण केलेली निःस्वार्थ भक्ती असते. म्हणूनच वारी हा केवळ प्रवास नसून माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारा संस्कार आहे.
"पंढरीची वारी आहे माझे घरी,
आणिक न करी तीर्थव्रत."
या अभंगातील भावना प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणात जिवंत असते. कारण त्याच्यासाठी पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नसते; ते प्रेम, समता, भक्ती आणि आत्मिक समाधानाचा अखंड झरा असतो.
वारी, हा मानवतेचा उत्सव आहे .
"अवघाची संसार सुखाचा करीन,
आनंदे भरीन तिन्ही लोक."
संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा संकल्प केवळ आध्यात्मिक नव्हता; तो संपूर्ण समाजाच्या कल्याणाचा होता. पंढरीची वारी हा त्या संकल्पाचा जिवंत आविष्कार आहे. येथे भक्ती आणि समाजकारण, अध्यात्म आणि व्यवहार, श्रद्धा आणि विवेक यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.
वारी ही शतकानुशतके महाराष्ट्राच्या समाजजीवनाला दिशा देणारी लोकचळवळ ठरली आहे. जात, पात, धर्म, भाषा, श्रीमंती, गरिबी, स्त्री-पुरुष, शिक्षित-अशिक्षित असे सर्व भेद येथे विरघळून जातात. विठू माऊलीच्या दारी प्रत्येकजण फक्त "वारकरी" असतो.
विठ्ठलाचं माऊलीपण प्रत्येक वारकऱ्यांच्या अंतःकरणात वाहू लागतं. म्हणून प्रत्येक वारकरी
दुसऱ्याला प्रेमाने "माऊली" म्हणतो.
एवढ्या मोठ्या जनसमुदायात कुठेही श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद दिसत नाही. समतेचा हा संस्कारच वारकरी संप्रदायाचे सर्वांत मोठे सामर्थ्य आहे.
संतांनी समाजाला केवळ भक्ती शिकवली नाही; तर विवेक, श्रमप्रतिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सदाचार यांचेही धडे दिले. संत सावता माळी शेतात राबत होते, गोरा कुंभार मातीला आकार देत होते, नरहरी सोनार सुवर्ण घडवत होते, सेना महाराज आपले काम करत होते; त्यांच्या हातात काम , ओठांवर मात्र अखंड विठ्ठलनाम होते. वारकरी संप्रदायाने आपल्या कृतीतून दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे,
कर्तव्य करत राहा, पण मन विठ्ठलाशी जोडून ठेवा.
आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि तणावाच्या काळात वारी माणसाची पुन्हा स्वतःशी भेट घडवून आणते. मोबाईल, पैसा, पद आणि प्रतिष्ठेच्या गर्दीत हरवलेल्या मनाला ती साधेपणाची आठवण करून देते. अनवाणी पायांनी चालताना अहंकार गळून पडतो, श्रमाचे मोल कळते
संवादातून दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव होते. म्हणूनच वारी ही केवळ शरीराची यात्रा नसून अंतर्मनाच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे.
वारी पर्यावरणाशीही नाते जोडते. पहाटेचा शीतल वारा, हिरवीगार शेते, पावसाने न्हालेली धरती, टाळ-मृदंगाच्या नादात पुढे सरकणाऱ्या दिंड्या आणि भक्तीच्या पताकांनी सजलेला मार्ग,हे सर्व निसर्ग आणि भक्ती यांचा विलक्षण मेळ घडवतात.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे."
या एका ओळीत निसर्गाशी असलेले आपले नाते किती सहजपणे व्यक्त झाले आहे! म्हणूनच वारी आपल्याला पर्यावरण संवर्धन, संयम निसर्ग व मानव यांच्यातील सहजीवनाचीही शिकवण देते.
वारी सेवेचं महत्व पटवून देते. आपण समाजाचं देणं लागतो याची जाणीव करून देते.
वाटेत असंख्य ग्रामस्थ वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची, अन्नाची, औषधांची आणि निवासाची व्यवस्था करतात. कुठे वैद्यकीय शिबिरे भरतात, कुठे अन्नछत्र चालते, तर कुठे थकलेल्या वारकऱ्यांना विश्रांती दिली जाते. ही सेवा प्रसिद्धीसाठी नसते; ती विठ्ठलभक्तीचीच एक सुंदर अभिव्यक्ती असते. म्हणूनच वारकरी संप्रदायात "सेवा हीच खरी पूजा" मानली जाते.
पंढरीची वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचेही प्रतीक आहे. अभंग, भारूड, कीर्तन, प्रवचन, फुगड्या, टाळ, मृदंग, वीणा, पताका या सर्वांनी मिळून एक समृद्ध लोकसंस्कृती घडवली आहे. ही परंपरा केवळ धार्मिक नाही; ती साहित्य, संगीत, लोककला आणि लोकसंस्कृतीचा अमूल्य वारसा आहे. म्हणूनच वारीकडे केवळ धार्मिक बाजूने न पाहता स्वतःचा शोध घ्यायला शिकवणारे अध्यात्म,
सामाजिक प्रबोधन, साहित्य , मानवतावादी संस्कृतीचा सभ्यतेचा पाया घालणारी चळवळ म्हणून पहायला हवे.
आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही लाखो तरुण वारीत सहभागी होतात, ही बाब विशेष आशादायी आहे. कारण वारी त्यांना डोळस श्रद्धा, शुद्ध प्रेम, आपसात सहकार्य, विनम्रता शिकवते. या मूल्यांची गरज आज पूर्वीपेक्षा अधिक आहे.
शेवटी एवढेच...
पंढरीची वारी ही केवळ पंढरपूरकडे जाणारी वाट नाही; ती माणसाच्या अंतःकरण शुद्धीची, स्वतःला
स्वतःच्या आत घेऊन जाणारी वाट आहे.
वारी समतेचा संदेश, मानवतेचा उत्सव करूणेचा अखंड प्रवाह आहे. विठ्ठलाच्या भेटीची आस मनात घेऊन चालणारा प्रत्येक वारकरी प्रत्यक्षात स्वतःच्याच अंतर्मनाचा शोध घेत असतो.
म्हणूनच आजही लाखो कंठांतून एकच स्वर घुमतो,
"ज्ञानोबा-तुकाराम...!
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल...!
श्री ज्ञानदेव तुकाराम...!"
आणि त्या गजरात मन नकळत विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होते.
"आता विश्वात्मके देवे,
येणे वाग्यज्ञे तोषावे;
तोषोनि मज द्यावे,
पसायदान हे..."
या पसायदानातील विश्वकल्याणाची प्रार्थना हीच पंढरीच्या वारीची खरी ओळख आहे. भक्ती माणसाला माणसाशी जोडणारी असावी, समता प्रस्थापित करणारी,समाजाला एकत्र आणणारी, जगण्याला बळ देणारी , प्रत्येक जीवावर प्रेम करायला शिकविणारी असावी. या सगळ्या गोष्टी वारीत प्रत्ययास येतात.
शाश्वत सत्याची अनुभूती देणारी ही अखंड, अविरत , चिरंतन वारी आजही महाराष्ट्राच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे.
- छाया.
रामकृष्णहरी माऊली!
उत्तर द्याहटवाउत्तम चिंतन!👏💐💐💐
मनापासून आभार 🙏🙏
हटवा